हिंदुत्वाचा गड असलेल्या नागपुरात सेनेची मोहीम; संजय राऊतांचा एल्गार म्हणाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 12:10 PM2022-04-21T12:10:37+5:302022-04-21T12:19:32+5:30
नागपूर हिंदुत्वाचा गड आहे, एकेकाळी येथे सेनेची ताकद होती. त्यामुळे नागपुरात शिवसनेचा पाया भक्कम करण्याची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले.
नागपूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता नागपूरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. विदर्भात सेना वाढवायची असेल तर नागपुरात पक्ष मजबूत करावा लागेल, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. ते नागपूर दौऱ्यावर असून महानगरपालिकेच्या दृष्टीने पक्षाच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात गेल्या एक महिन्यातील राऊत यांचा हा दुसरा दौरा आहे.
नागपूर हिंदुत्वाचा गड आहे, एकेकाळी येथे सेनेची ताकद होती. त्यामुळे नागपुरात शिवसनेचा पाया मजबूत करण्याची गरज आहे. नागपुरात आमच्यासारखे लोक येतात तेव्हा मोठ्या प्रमाणात लोक जमतात. या सर्वांना पक्षासोबत काम करण्याची इच्छा आहे. आदित्य ठाकरेदेखील नागपूरचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील राज्याच्या आणि विदर्भातील पक्षकार्यात स्वत: लक्ष घालत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
२०२४ साली विधानसभेत मजबूतीनं उभं राहायचं असेल तर आम्हाला विदर्भात काम करणं गरजेचं आहे. अनेक जिल्ह्यात नव्याने कार्य सुरू झाले आहे. याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. नागपुरात महापालिकेची निवडणूक आहे. त्यासाठी शिवसेना तयारी करत आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
आयएनएस विक्रांतवरून कारवाईचा इशारा
आयएनएस विक्रांत हा खूप मोठा घोटाळा आहे. कोणी कितीही बडबड केली. तरीही पोलीस लवकरच तपास करून कारवाई करतील. आम्ही पुराव्यासह बोललो आहोत, बाकी पोलीस तपासात काय निष्पन्न होतं हे लवकरच पुढे येईल, असा इशारा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिला.