तर भाजपचे नेते काय... ईडीच्या कारवाईवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 02:30 PM2022-03-23T14:30:41+5:302022-03-23T15:51:00+5:30
ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले आहे, भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाहीत तर ते काय भीक मागत आहेत का, केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर त्यांनी त्यांच्या चष्म्याच नंबर हा बदलावा लागेल, असे राऊत म्हणाले.
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली. त्यांच्यावरील कारवाई अयोग्य असल्याचे सांगत ईडी वसूलीचे काम करत असल्याची टीका शिवसेना खासदारसंजय राऊत यांनी केली.
शिवसंपर्क अभियानासाठी राऊत नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हा मनमानी पद्धतीचा कारभार हुकुमशाहीची नांदी आहे. ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले आहे, भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाहीत, तर ते काय भीक मागत आहे का, केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर त्यांचा चष्म्याच नंबर हा बदलावा लागेल, असे राऊत म्हणाले.
काही लोकांना दिलासा दिला जातो. मात्र आमच्या तक्रारीवर काहीच होत नाही. मी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि किरीट सोमय्यांच्या आरोपांबाबत पुरावे दिले आहे पण त्याची कोणतीही दखल घेतली नाही, असाही गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडीकडूनही कारवाईला सुरुवात झाली आहे. पण ही कारवाई योग्य पद्धतीने केली जाईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.