विदर्भातील शिवसेना खासदारांचे ‘तळ्यात - मळ्यात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 07:00 AM2022-06-24T07:00:00+5:302022-06-24T07:00:06+5:30
शिवसेनेचे बहुतांश आमदार गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले असताना विदर्भातील शिवसेनेच्या तीनही खासदारांनी मात्र यासंदर्भात आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत.
योगेश पांडे
नागपूर : शिवसेनेचे बहुतांश आमदार गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले असताना अनेक खासदारदेखील त्यांच्या संपर्कात असल्याचे दावे करण्यात येत आहेत. विदर्भातील शिवसेनेच्या तीनही खासदारांनी मात्र यासंदर्भात आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत. परंतु यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात बंडखोर आमदारांची भूमिका समजावून घ्या, असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांची बाजू उचलून धरली होती. परंतु एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वच मान्य आहे का याबाबत स्पष्ट भूमिका मांडायला एकही खासदार तयार नसल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’ने तिघाही खासदारांशी संपर्क केला. भावना गवळी यांचा फोन ‘नॉट रिचेबल’च होता. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्याशी एकनाथ शिंदे गटातून संपर्क झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुमाने सद्यस्थितीत नवी दिल्ली येथे आहेत. परंतु तुमाने हेदेखील गुवाहाटीला जाणार असल्याची अफवा बुधवारी मध्यरात्रीनंतर पसरली आणि ‘सोशल मीडिया’तून गुरुवारी सकाळी तुमाने यांनी तातडीने भूमिका मांडली. माझ्याशी कुणीही संपर्क केलेला नाही व मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मी शिवसेनेसोबतच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ‘लोकमत’ने त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता मी मांडलेली भूमिका प्रकाशित करण्यासाठी नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यापैकी कुणासोबत आहात, याबाबत उत्तर देण्याचे मात्र त्यांनी टाळले.
जाधवांची भूमिका; कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजप परवडली
बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्याबाबतदेखील चर्चांना उधाण आले होते. परंतु त्यांनी ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची भूमिका मांडली. परंतु असे करत असताना त्यांनी एकनाथ शिंदे गटाची मागणीदेखील लावून धरली. भाजप व शिवसेनेने एकत्र येणे आवश्यक आहे. मागील २५ वर्षांत दोन्ही पक्ष एकमेकांमुळेच वाढले. हिंदुत्व हा दोन्ही पक्षांचा आत्मा आहे व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहण्यापेक्षा भाजपसोबत जाणे कधीही चांगलेच आहे, ही त्यांची सूचक प्रतिक्रिया बरेच काही संकेत देणारी आहे. जाधव हे सद्यस्थितीत नवी दिल्ली येथे आहेत.