कर्जमुक्तीसाठी शिवसेना रस्त्यावर
By admin | Published: June 6, 2017 06:03 PM2017-06-06T18:03:22+5:302017-06-06T18:03:22+5:30
सोमवारी कोरची येथे पाळलेल्या बंदनंतर मंगळवारी शिवसेनेने या आंदोलनात उडी घेतली.
आॅनलाईन लोकमत
कुरखेडा (गडचिरोली) : राज्यात पेटलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गडचिरोली जिल्ह्यात फारसा परिणाम नसला तरी सोमवारी कोरची येथे पाळलेल्या बंदनंतर मंगळवारी शिवसेनेने या आंदोलनात उडी घेतली. कुरखेडा-वडसा मार्गावरील आंधळी-चिखली फाट्यावर दोन तास वाहतूक रोखून चक्काजाम करण्यात आला.
‘शेतकऱ्यांचा एकच नारा, सातबारा कोरा’ अशा नाऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सकाळी १० ते १ वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनीही सहभागी होऊन सत्ताधारी भाजपविरूद्ध आपला रोष व्यक्त केला. यावेळी शेतमालाला दीड पट भाव द्या यासह इतरही मागण्यात करण्यात आल्या. यावेळी राज्य मार्गावर बऱ्याच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर तहसीलदार अजय चरडे यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पो.अधिकारी अभिजित फस्के, ठाणेदार योगेश घारे हेसुद्धा उपस्थित होते.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनात कुरखेडा न.पं.चे अध्यक्ष डॉ.महेंद्र मोहबंसी, माजी बालकल्याण सभापती निरांजनी चंदेल, नगरसेवक सोनू भट्ट, संतोष मारगोनवार, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, नरेंद्र तिरणकर, माजी जि.प.सदस्य अशोक इंदूरकर, सेनेचे तालुका प्रमुख आशिष काळे, धनेंद्र परिहार, दशरथजी लाडे, शेतकरी संघटनेचे नेते धिसू पाटील खुणे, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत किसनाके, सरपंच टिकाराम कोरेटी, माजी उपसभापती बबन बुद्धे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.