नागपुरात शिवसेनेची दोन आंदोलने, बंडखोरांचा पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 12:36 PM2022-06-27T12:36:10+5:302022-06-27T12:40:43+5:30
किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात रेशीमबागेत, तर नागपूर शिवसेना कार्यालयासमोर नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.
नागपूर : शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेले होर्डिंग फाडल्यानंतर शिवसैनिकांनी रविवारी आणखी आक्रमक पवित्रा घेतला. शिंदे व त्यांच्या गटाला नागपुरात कुणी समर्थन करण्याची भाषा बोलली किंवा होर्डिंग्ज लावले तर त्याला ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. रविवारी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली.
शिवसेनेचे पदाधिकारी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये रस्त्यावर उतरले होते. रेशीमबाग चौक तसेच शिवसेना कार्यालयाजवळ बंडखोरांविरोधात निदर्शने करण्यात आली. किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात रेशीमबागेत, तर नागपूर शिवसेना कार्यालयासमोर नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.
रेशीमबाग चौकात झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी गद्दारांना माफी नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचा प्रतीकात्मक पुतळा देखील जाळला. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक एकत्रित आले होते.
तर दुसऱ्या आंदोलनात शहरप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. अगोदर शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांची बैठक झाली. त्यानंतर कार्यालयाच्या बाहेर येत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण शिवसेना ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे व त्यांच्यासोबत राहणार, अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली.
नागपुरात देखील दोन गट
एकीकडे राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्याने राजकारण तापले असताना नागपुरात देखील गटबाजी दिसून येत आहे. दोन्ही गट पक्ष प्रमुखांचे समर्थन करीत आहेत. मात्र, सोबत येण्यापेक्षा वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी रस्त्यांवर येत घोषणाबाजी करत आहे. मागील तीन दिवसांपासून सातत्याने असा प्रकार होत आहे. रविवारी देखील हेच चित्र होते. दोन ठिकाणी दोन आंदोलनं झाल्याने शहरातही शिवसेनेचे दोन गट आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.