शिवसेनेच्या उमेदवाराला मारहाण, शिवीगाळ
By admin | Published: February 22, 2017 02:44 AM2017-02-22T02:44:26+5:302017-02-22T02:44:26+5:30
मतदानाची वेळ संपत आली असताना पाचपावली परिसरातील प्रभाग क्रमांक ७ येथील सिंधू महाविद्यालयातील केंद्रावर
पाचपावली पोलीस ठाण्यासमोर समर्थकांची निदर्शने : भाजप उमेदवाराने पैसे वाटल्याचा आरोप
नागपूर : मतदानाची वेळ संपत आली असताना पाचपावली परिसरातील प्रभाग क्रमांक ७ येथील सिंधू महाविद्यालयातील केंद्रावर भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झाले. भाजपचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारांनी केला. याला विरोध केला असता शिवसेनेचे उमेदवार किशोर ठाकरे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोलीत डांबून मारल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रासमोर निदर्शने करीत पाचपावली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पाचपावली पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.
प्रभाग क्रमांक ७ चे शिवसेनेचे उमेदवार किशोर ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भाजपचे उमेदवार मतदान केंद्रात बसून मतदारांना पैसे वाटत असल्याची तक्रार काही कार्यकर्त्यांनी माझ्याकडे केली. मी स्वत: जाऊन पाहिले तेव्हा उमेदवार मतदार यादी घेऊन मतदान केंद्रात बसल्याचे दिसले. मी याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु माझ्या तक्रारीकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला पकडून मारहाण केली. इलियास भाई यांनी येऊन मला सोडविले. यानंतर महिला उमेदवारालाही शिवीगाळ करीत भाजपचे कार्यकर्ते निघून गेले.
काही वेळांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ही बाब समजातच मतदान केंद्रावर शिवसेनेचे कार्यकर्ते आले. त्यांनी भाजपच्या विरोधात नारेबाजी केली. नारेबाजी करीत सर्व कार्यकर्ते पाचपावली पोलीस ठाण्यावर गेले. ठाण्यासमोर बराच वेळ नारेबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. (प्रतिनिधी)