शिवसेनेचा धनगर आरक्षणाला कायमच पाठिंबा, अहिल्याबाईंच्या कामाची मिळते पदोपदी साक्ष - नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 05:45 PM2017-12-22T17:45:40+5:302017-12-22T17:46:42+5:30
राज्यातील धनगर समाजाने एकेकाळी मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. अहिल्या देवी होळकरांनी केलेल्या कामाच्या पाउलखुणा आजही सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजाचा विकास होण्यास ख-या अर्थाने मदत झाली आहे. धनगर व धनगड या दोन्ही शब्दांत केवळ एकाच अक्षराचा फरक असून तो काढून टाकल्यास अनेक समाजघटकांना न्याय मिळू शकेल.
नागपूर : राज्यातील धनगर समाजाने एकेकाळी मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. अहिल्या देवी होळकरांनी केलेल्या कामाच्या पाउलखुणा आजही सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजाचा विकास होण्यास ख-या अर्थाने मदत झाली आहे. धनगर व धनगड या दोन्ही शब्दांत केवळ एकाच अक्षराचा फरक असून तो काढून टाकल्यास अनेक समाजघटकांना न्याय मिळू शकेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर आर्थिक आरक्षण असावे असे सांगितले होते. आताही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठींबा देऊ केला आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधान परिषदेत केले. परिषदेच्या सभागृहात नियम ९७ अन्वये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आ. रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, “अहिल्या देवी होळकर, मल्हारराव होळकर यांनी मराठी साम्राज्याचा केलेला विस्तार व समाज हिताच्या दृष्टीने केलेल्या अनेक योजना आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. त्यामुळेच ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही थोर व्यक्तिमत्वे आज सर्व समाजाला आपली वाटतात. मंडल आयोगाने सादर केलेल्या अहवालानंतर देशात आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. या समाजाने त्यांच्या आरक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने केली आहेत. आरक्षण मिळावे या मुद्द्यावरून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. १९५० ते २०१७ या ६७ वर्षातील ५५ वर्षे कॉंग्रेसचे राज्य या देशावर होते. परंतु या भोळ्या समाजाला कोणत्याही सुविधा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मधल्या काळात जनता दलाच्या व्ही पी सिंगांच्या सरकारलाही या विषयी निर्णय घ्यावासा वाटला नाही. राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. धनगर समाजाच्या विकासाची मागणी केलेल्या महाराष्ट्राचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या कार्याची आज आठवण होते आहे. त्यांची कमतरता आजही सर्वांनाच भासत आहे. या आंदोलनाला यश मिळावे या करिता शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल.
धनगर ही या देशातील आती प्राचीन स्वतंत्र अस्तित्व असणारी विचार व आचार धारा आहे .धनगर ही संपूर्ण देशभर आढळणारी बहुभाषिक जमात आहे. आदिवासी वा इतर जातींच्या हिताला धक्का न लावता या समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे.”