‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य टाकणार महत्त्वाच्या इतिहासावर प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 07:11 PM2018-11-17T19:11:20+5:302018-11-17T19:14:15+5:30
‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार असून या महानाट्यातून शंभुराजे यांना जाणून घेण्याची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार असून या महानाट्यातून शंभुराजे यांना जाणून घेण्याची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपुरात ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे सात प्रयोग २२ ते २८ डिसेंबरदरम्यान रेशीमबागच्या मैदानावर सायकाळी ५.३० ते ९.३० दरम्यान होणार आहेत. संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व मांडणाऱ्या महानाट्याला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सिनेकलावंत डॉ. अमोल कोल्हे हे संभाजींची भूमिका साकारणार आहेत. महानाट्याची निर्मिती महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शनने केली आहे. लेखन दिग्दर्शन, संवाद अॅड. महेंद्र महाडिक यांचे आहे. महानाट्य नि:शुल्क असून दररोज ४० हजार प्रेक्षक या महानाट्याचा लाभ घेऊ शकतील, असा विश्वास मोहन मते यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेवक प्रवीण दटके, संजय खुळे, बिज्जू पांडे उपस्थित होते.
१३० फुटांचा भव्य रंगमंच
महानाट्यासाठी १३० फुटांचा भव्य रंगमंच साकारण्यात येणार आहे. महानाट्यात औरंगजेबाची भूमिका रवी पटवर्धन साकारणार आहेत. संगीत चिन्मय सत्यजित यांचे असून गीत अॅड महेंद्र महाडिक, दत्तात्रय सोनवणे, रोहित पंडित यांचे आहे. यात हत्ती, घोडे, उंट, बैलांचा वापर करण्यात आला आहे. मराठे-मुघल यांच्यातील तलवार युद्ध, तोफांचा गडगडाट, अग्निबाणांचा वर्षाव, पालखी, राज्याभिषेक सोहळा आदींचा समावेश राहील. महानाट्यात एकूण २५० कलावंत भूमिका वठविणार आहेत.