नागपूरच्या तीन खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:48 AM2019-02-14T11:48:46+5:302019-02-14T11:50:03+5:30
राज्याच्या क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची बुधवारी घोषणा झाली. शहरातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी यांच्यासह राष्ट्रीय हॅण्डबॉलपटू समीक्षा इटनकर हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची बुधवारी घोषणा झाली. शहरातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी यांच्यासह राष्ट्रीय हॅण्डबॉलपटू समीक्षा इटनकर हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले.
बुद्धिबळपटू दिव्या व रौनक यांची कामगिरी आश्चर्यचकित करणारी अशीच आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून दिव्या व रौनकने आॅरेंज सिटीची वेगळी ओळख निर्माण केली. दोघांनी राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदांना गवसणी घातली. ‘वंडरगर्ल' दिव्याने वयाच्या सातव्या वर्षीच डब्ल्यूएफएम (वूमन फिडे मास्टर) हा नॉर्म पूर्ण केला होता. सर्वात कमी वयात हा नॉर्म पूर्ण करणारी दिव्या महाराष्ट्रातील पहिली बुद्धिबळपटू ठरली . आंतरराष्ट्रीय मास्टर (आयएम) हे बुद्धिबळातील मानाचे स्थान प्राप्त करणाऱ्या रौनक साधवानीने अनेक राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्पर्धा गाजविल्या आहेत.
रौनक सद्यस्थितीत लिच (आॅस्ट्रिया) येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे. दोन्ही बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत केलेल्या कामगिरीच्या बळावर त्यांची शिवछत्रपती पुरस्कारासाठी थेट निवड झाली . महिलांच्या राज्यस्तरीय व राष्टष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणारी प्रतिभावंत हॅण्डबॉलपटू समीक्षा इटनकरची सुद्धा छत्रपती पुरस्कारासाठी निवड झाली आहे. दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त सीताराम भोतमांगे व सुनील भोतमांगे यांच्या मार्गदर्शनात समीक्षा यशवंत स्टेडियम येथे नियमित सराव करते.
पुरस्कारामुळे प्रेरणा मिळेल: दिव्या
‘या पुरस्काराबद्दल मला माहीत नव्हते. परंतु, शासनाच्या सर्वात मोठ्या छत्रपती पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याबद्दल मला आनंद झाला. हा पुरस्कार इतक्या लवकर मिळेल अशी अपेक्षा नव्हती. वूमन इंटरनॅशनल मास्टर (डब्ल्यूआयएम) हा नॉर्म कमी वयात पूर्ण केल्याबद्दल माझी निवड करण्यात आली. प्रत्येक पुरस्कार हा खेळाडूंसाठी महत्त्वाचा व प्रोत्साहित करणारा असतो. छत्रपती पुरस्कारामुळे मला प्रेरणा मिळेल व मी आणखी चांगली कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेल. इंटरनॅशनल मास्टरचा दुसरा नॉर्म त्वरीत पूर्ण करणे, हेच माझे लक्ष्य असेल.’
ग्रॅण्डमास्टर बनणे हेच ध्येय: रौनक
‘पुरस्कारामुळे मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. बुद्धिबळ खेळात ग्रॅण्डमास्टर बनणे माझे ध्येय असून पुरस्कारामुळे ध्येय पूर्ण करण्यास मदतच मिळणार आहे. सध्या विदेशात स्पर्धा खेळत असल्यामुळे पुरस्कार स्वीकारणे शक्य नाही. त्यामुळे माझे वडील हा पुरस्कार स्वीकारतील.’