शिवराज सिंग चौहान संघ मुख्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:03 PM2018-04-11T22:03:41+5:302018-04-11T22:03:56+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता व सायंकाळीच चौहान नागपुरात दाखल झाले होते. मध्य प्रदेशात पाच संतांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिल्यानंतर तेथील राजकारण तापले आहे. यावर्षी तेथे विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे.
सायंकाळी ७ वाजता चौहान संघ मुख्यालयात दाखल झाले. यावेळी सुमारे २० मिनिटे त्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केली. त्यानंतर सरसंघचालक मुख्यालयातून नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. भय्याजी जोशी यांच्यासमवेत चौहान यांची ८.३० वाजेपर्यंत चर्चा चालली. मध्यप्रदेशात यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवराज सिंह हे गेल्या १५ वर्षांपासून तेथे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे यंदा निवडणुकांचे वर्ष असल्याने चौहान यांनी सरकार्यवाहांचे मार्गदर्शन घेण्यासाठी नागपुरातील संघ मुख्यालयात हजेरी लावल्याचे बोलले जाते. या भेटीत नेमके काय बोलणे झाले याची अधिकृत माहिती कळू शकली नाही. चौहान यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.