शिवराजसिंग चौहान यांची संघ मुख्यालयाला भेट
By Admin | Published: April 13, 2016 03:15 AM2016-04-13T03:15:30+5:302016-04-13T03:15:30+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली.
१० दिवसांत दुसरी भेट : भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा
नागपूर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली. मध्य प्रदेशमधील गो-अभयारण्याचे लोकार्पण तसेच वैचारिक कुंभ मेळाव्यात मार्गदर्शन करण्याचे निमंत्रण जोशी यांना देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ९ दिवसांपूर्वीच चौहान यांनी संघ मुख्यालयात येऊन सरसंघचालकांचीदेखील भेट घेतली होती. लगेच झालेल्या त्यांच्या या दौऱ्यामुळे विविध चर्चांनादेखील उधाण आले आहे.मध्य प्रदेशातील उज्जैन येथे सिंहस्थ कुंभमेळा साजरा क ेला जाणार आहे. संघाने महाकुं भ वैचारिक कुंभमेळा म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून यावर पाच हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. भव्यदिव्य महाकुंभाच्या नियोजनासोबतच राजकीय व शेतीविषयक बाबींवर चौहान यांनी जोशी यांच्याशी सखोल चर्चा केली. तब्बल अडीच तास ते संघ मुख्यालयात होते.(प्रतिनिधी)
भेटीमागे दडले काय ?
एकाच कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन दोनदा चौहाण संघ मुख्यालयात आल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ३ एप्रिल रोजी त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती. व्यापम् घोटाळ्यासंदर्भात चौहान यांच्यावर टीका होत आहे. विशेषत: माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. संघाच्या पदाधिकाऱ्यांवरदेखील या घोटाळ्याबाबत दोषारोप झाले होते. मध्य प्रदेशचे मंत्री अरविंद मेनन यांना राष्ट्रीय पातळीवर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. हे मध्य प्रदेशातील राजकीय बदलांचे संकेत मानण्यात येत असल्याचीदेखील चर्चा आहे. त्यामुळे निमंत्रणाचे कारण समोर करून राजकीय पटलावरील अस्वस्थतेवर या भेटीत चर्चा झाली असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. चौहान यांनी या भेटीतील तपशील सांगण्यास नकार दिला.
बाबासाहेबांच्या जन्मगावी होणार भव्य कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त त्यांचे जन्मगाव महू येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यात सहभागी होणार आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. परंतु आम्ही असे कुठलेही पत्र पाठविले नसल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले.