शिवराजसिंह चौहान यांची सरसंघचालकांशी भेट; ५० मिनिटे बंदद्वार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 08:57 PM2023-02-15T20:57:15+5:302023-02-15T20:57:54+5:30
Nagpur News मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी सुमारे ५० मिनिटे चर्चा केली.
नागपूर : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी सुमारे ५० मिनिटे चर्चा केली. मध्यप्रदेशमध्ये वर्षाखेरीस होणाऱ्या निवडणुका तसेच राज्यातील अंतर्गत राजकारण पाहता ही भेट अतिशय महत्त्वाची मानण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशमध्ये सुरू असलेल्या काही विकास प्रकल्पांबाबतदेखील यावेळी चौहान यांनी सरसंघचालकांना माहिती दिली.
सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शिवराजसिंह चौहान संघ मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी अगोदर मुख्यालयातील वरिष्ठ प्रचारकांची भेट घेतली. त्यानंतर सरसंघचालकांशी चर्चा केली. १०.३५ च्या जवळपास ते संघ मुख्यालयातून बाहेर निघाले. या भेटीबाबत त्यांनी कुठलेही वक्तव्य दिले नाही, तर संघ पदाधिकाऱ्यांनीदेखील मौन राखले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशमधील काही विशिष्ट प्रकल्पांबाबत यावेळी चौहान यांनी सरसंघचालकांना माहिती दिली. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशमध्ये वर्षाखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुका, मंत्रिमंडळ विस्तार व संघटनेतील बदल तसेच भाजपमधील अंतर्गत असंतोषाबाबत चर्चादेखील झाली. मध्यप्रदेशात भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी राज्याच्या मद्य धोरणावरून स्वतःच्याच सरकार विरोधात आघाडी उघडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि भाजप सरकार बॅकफूटवर आलेय. याप्रकरणी भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय आणि केंद्रातील इतर नेत्यांनी उमा भारती यांच्याशी चर्चा केली. परंतु, त्यानंतरही उमा भारती यांच्याकडून सातत्याने मद्य धोरणावरून टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानण्यात येत आहे.