अवघ्या पाच ओळीत शिवरायांचा इतिहास

By admin | Published: December 17, 2014 12:30 AM2014-12-17T00:30:11+5:302014-12-17T00:30:11+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्याच इतिहासाची सातत्याने अवहेलना करण्यात येत आहे. देशाबाहेरून आलेल्या मुघल सम्राटांना मोठी जागा देणाऱ्या ‘एनसीईआरटी’ने

Shivrajaya's history in just five lines | अवघ्या पाच ओळीत शिवरायांचा इतिहास

अवघ्या पाच ओळीत शिवरायांचा इतिहास

Next

‘एनसीईआरटी’च्या प्रतापांकडे अद्यापही दुर्लक्ष
योगेश पांडे - नागपूर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्याच इतिहासाची सातत्याने अवहेलना करण्यात येत आहे. देशाबाहेरून आलेल्या मुघल सम्राटांना मोठी जागा देणाऱ्या ‘एनसीईआरटी’ने (नॅशनल कौन्सिल आॅफ एज्युकेशन रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग) इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची माहिती अवघ्या पाच ओळीत दिली आहे. पुस्तकात नगण्य स्थान दिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत महाराजांच्या पराक्रमाचा गौरवशाली इतिहास योग्य तऱ्हेने पोहचत नसल्याचे चित्र आहे. राज्य शासन याबाबत पुढाकार घेऊन केंद्र व ‘एनसीईआरटी’ला इतिहासात बदल करायला भाग पाडणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
इयत्ता सातवीच्या ‘हमारे अतीत-२’ या इतिहास विषयाच्या पुस्तकातील बहुतांश पानांमध्ये भारतावर आक्रमण करणाऱ्या मुघल सम्राटांची माहिती मोठ्या प्रमाणात देण्यात आली आहे. परंतु लाखो नागरिकांचे आदर्श असलेल्या शिवरायांची माहिती अवघ्या पाच ओळीत छापण्यात आली आहे. निरनिराळ्या मुघल सम्राटांना स्वतंत्र स्थान देत असताना शिवाजी महाराज, पेशवे यांचा इतिहास ‘मराठा’ या शीर्षकाखाली दीड पानात संपविण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतिहासाच्या या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे एकही छापील चित्र नाही. केंद्रातील हाच अभ्यासक्रम महाराष्ट्रातील अनेक शाळांत शिकवला जात असून, लाखो विद्यार्थी शिवरायांच्या इतिहासापासून वंचित राहत आहेत. यासंदर्भात गेल्या पाच वर्षांपूर्वीदेखील आवाज उठविण्यात आला होता. परंतु त्यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा झाला नव्हता.
राज्याच्या अस्मितेचा प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही फोटो ‘एनसीईआरटी’ला उपलब्ध होऊ नये, ही आश्चर्याची बाब आहे. ही राज्याच्या अस्मितेची बाब आहे. भाजपा-शिवसेनेच्या या सरकारने आपल्या अधिकारात या पुस्तकात बदल करावा. त्यांना पुस्तकात २५ टक्के बदल करण्याचा अधिकार आहे. हे शक्य नसेल तर कमीतकमी केंद्राकडे आक्षेप नोंदवून हा मुद्दा लावून धरावा, असे मत हिंदू जनजागरण समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले. गोवा सरकारने २००९ सालीच या पुस्तकात बदल केला असल्याचा दावादेखील त्यांनी केला. यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
भारतमातेवर आक्षेप?
याशिवाय इयत्ता दहावीच्या ‘भारत और समकालीन विश्व-२’ या पुस्तकात भारतमातेचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. ज्या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी देशातील हुतात्म्यांनी जात-धर्म-पंथ यांना बाजूला सारत बलिदान केले, त्यावरून आक्षेपार्ह टीप लिहिण्यात आली आहे. हातात त्रिशूळ घेऊन सिंहाजवळ उभ्या असलेल्या भारतमातेचे चित्र देशातील सर्व पंथ-समुदायांच्या लोकांना मान्य होईल का, असा प्रश्न यात उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: Shivrajaya's history in just five lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.