सर्वच आमदार श्रीमंत नाहीत, घर देण्यात गैर काय? : प्रियंका चतुर्वेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 06:34 PM2022-03-25T18:34:55+5:302022-03-25T18:50:48+5:30
शिवसेना संपर्क मोहिमेसाठी विदर्भात आलेल्या चतुर्वेदी शुक्रवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान बोलत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाविकास आघाडी सरकारने आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या निर्णयावरून जनतेतून विविध प्रतिक्रिया येत असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या खा. प्रियंका चतुर्वेदी यांनी या मुद्द्याचे समर्थन केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदारांना अधिवेशन व इतर कामांसाठी सातत्याने मुंबईत यावे लागते. त्यांची गैरसोय होऊ नये व राहण्याची सुविधा होणे गरजेचे आहे. शिवाय सर्वच आमदार श्रीमंत नाहीत, त्यामुळे गरीब आमदारांना घरे बांधून दिली तर त्यात गैर काय, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना संपर्क मोहिमेसाठी विदर्भात आलेल्या चतुर्वेदी शुक्रवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान बोलत होत्या.
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे पेट्रोलचे दर प्रचंड वाढले असतानाही निवडणुका असल्याने कुठलीही दरवाढ करण्यात आली नव्हती. आता आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी असताना दरवाढ केली आहे. निवडणूक आटोपल्याने इंधनावरचे डिस्काउंटही संपले असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपने काश्मिरी पंडितांना सुरक्षित जागा दिली का?
काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून भाजपकडून विविध आरोप होत आहेत. मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्यावर अत्याचार होत होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मदतीचा हात दिला होता. भाजपने काश्मिरी पंडितांना एक तरी सुरक्षित जागा दिली का, असा सवाल चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. ‘द काश्मीर फाईल’ हा सिनेमा करमुक्त करण्यावरून भाजप राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपने नैतिकता पाळली नाही
आमची भाजपसोबत २५ वर्षे युती होती. त्यांना विदर्भ हवा होता, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य केले. मात्र भाजपने नैतिकता पाळली नाही. आम्ही आता विदर्भाकडे परत लक्ष देत असून, लवकरच येथेदेखील पक्ष मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.