अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती; निर्णय घाईघाईने घेतला गेला : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 11:57 AM2022-03-22T11:57:30+5:302022-03-22T12:59:59+5:30

केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Shivsena MP sanjay raut critisized over Central Investigation Agency and bjp | अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती; निर्णय घाईघाईने घेतला गेला : संजय राऊत

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती; निर्णय घाईघाईने घेतला गेला : संजय राऊत

Next

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चूक होती. तो निर्णय घाई-घाईत घेण्यात आला, त्यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिलं आहे. ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्यावर धाडी घातल्या, तेही आम्ही पाहिलं आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. जिथे भाजपचे सत्ता नाही त्या राज्यांमध्ये ईडीच्या कारवाया होत आहेत. मीदेखील एक पीडित असून माझ्या कुटुंबीयांवरही आरोप करण्यात आले, असल्याची टीकाही राऊत यांनी केली. 

शिवसंपर्क अभियानासाठी नागपुरात आले असता आज(दि. २२) त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय तपास यंत्रणेकडूण होणाऱ्या कारवायांबाबत बोलताना त्यांनी केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचे म्हटले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत आहे. ममता बॅनर्जींच्या भाच्यावर ईडीने चौकशीसाठी बोलावलं. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय नागरिकाला ईडीचं भय दाखवलं. तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत असल्याचे राऊत म्हणाले. 

भाजप देशभरात सुडाचे राजकारण करत आहेत. पण, दहशत हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही, खोटी प्रकरणे बनवून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे पण आम्ही अजिबात वाकणार नाही, मोडण्याचा तर प्रश्नच सोडा, असं संजय राऊत म्हणाले. केंद्र सरकारकडून इडीचा दुरुपयोग सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांपेक्षा महाराष्ट्र पोलीस अधिक सक्षम असल्याचे राऊत म्हणाले.

विदर्भानं बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला खूप प्रेम दिलं. गेल्या काही दिवसांपासून विधानसभेतील विदर्भातून शिवसेनेचं प्रतिनिधित्व कमी झालं असून त्याला काही कारणं आहेत. युतीच्या काळात विदर्भाच्या जागा भाजपने घेतल्या आणि आमची विदर्भात पीछेहाट झाली. शिवसंपर्क अभियानाच्या कामाला चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे सुरुवात नागपुरातून करत आहोत. नागपुरात येऊन राजकारण करण्याची गरज नाही, असेही राऊत म्हणाले.

Web Title: Shivsena MP sanjay raut critisized over Central Investigation Agency and bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.