शिवसेनेचे संपर्कप्रमुख बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 02:26 AM2017-08-13T02:26:27+5:302017-08-13T02:26:56+5:30
भाजपाचा गड असलेल्या नागपुरात शिवसेनेच्या डरकाळीचा आवाज वाढविण्यासाठी पक्ष प्रमुखांनी आ. तानाजी सावंत यांना नागपूरचे संपर्क प्रमुख म्हणून मोहिमेवर पाठविले होते.
कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचा गड असलेल्या नागपुरात शिवसेनेच्या डरकाळीचा आवाज वाढविण्यासाठी पक्ष प्रमुखांनी आ. तानाजी सावंत यांना नागपूरचे संपर्क प्रमुख म्हणून मोहिमेवर पाठविले होते. मात्र, महापालिका निवडणुकीत तानाजींची तलवार म्यान झाली. शिवसेनेचा दारुण पराभव झाला. निवडणुकीनंतर सावंत यांनी नागपुरात एक आढावा बैठक घेतली. आता तीन महिन्यांपासून संपर्कप्रमुख संपर्कात नसल्याचे चित्र आहे. याची पक्ष पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून लवकरच सावंत यांच्याकडून नागपूरचे संपर्कप्रमुख पद काढून घेतले जाणार असल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणुकीच्या पूर्वी डिसेंबर २०१६ मध्ये आ. तानाजी सावंत यांची शिवसेनेतर्फे नागपूरचे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. पहिल्याच सभेत सावंत यांनी भाजपावर तोफ डागत शिवसैनिकांना रसद पुरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी सावंत भूमिगत झाल्यागत होते. पदाधिकाºयांची एक बैठक घेऊन सावंत गेले ते निकाल लागेपर्यंत परतलेच नाहीत. शिवसेना अनेक उमेदवारांपर्यंत वेळेत ए-बी फॉर्म पोहचवू शकली नाही. त्यामुळे सर्वच जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढू शकले नाही. गेल्यावेळी सहा नगरसेवक असलेली शिवसेना फक्त दोन नगरसेवकांवर थांबली. निवडणूक काळात संपर्कप्रमुख संपर्कातच नव्हते. त्यांच्याकडून काहीच मदत मिळाली नाही, अशी उघड नाराजी उमेदवार व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाऊ लागली.
निवडणुकीनंतर दीड महिन्यांनी सावंत यांनी नागपुरात येत गणेशपेठेतील नव्या शिवसेना भवनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीतही कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी सावंत यांनी आपल्याकडे सोलापूर, उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांची निवडणूक जबाबदारी असल्यामुळे नागपुरात जास्त वेळ देऊ शकलो नाही, असे स्पष्ट केले होते. सोबतच यापुढे दरमहा नियमित बैठक घेतली जाईल. शिवसैनिकांचे प्रश्न सोडविले जातील. संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाईल, असा सर्व कार्यक्रम सांगितला होता. त्यामुळे नाराज कार्यकर्ते काहीसे नमले होते. मात्र, त्यानंतर तीन महिने होऊनही सावंत नागपुरात फिरकलेले नाहीत. या सर्व घटनाक्रमाचा पाढा ‘मातोश्री’वर वाचण्यात आला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावंत यांच्याकडून लवकरच नागपूरच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी काढून घेतली जाणार आहे. याबाबत तानाजी सावंत यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
तीन वर्षांपासून कार्यकारिणी नाही
सप्टेंबर २०१४ मध्ये शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. सतीश हरडे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभार सोपविण्यात आला. आता तीन वर्षे होऊनही नवी कार्यकारिणी तयार झालेली नाही. पूर्वीचे संपर्क प्रमुख आ. अनिल परब व त्यानंतर आलेले आ. तानाजी सावंत या दोन्ही नेत्यांनी लवकरच कार्यकारिणी जाहीर करू, असे वेळोवेळी जाहीर केले. मात्र, कार्यकारिणी जाहीर झाली नाही. लोकसभा, विधानसभा व महापालिका अशी तीन निवडणुकांना शिवसेना विना कार्यकारिणीने सामोरे गेली. तिन्हीत पराभव हाती आला. तरी पक्षश्रेष्ठींनी दखल घेतलेली नाही. पदाशिवाय वावरणाºया स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या विषयावरून खदखद आहे.