शिवसेनेचे नागपूरचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:57 AM2018-08-06T11:57:55+5:302018-08-06T12:14:37+5:30
एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांना अखेर नागपूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी नागपुरात जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांना अखेर नागपूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी नागपुरात जेरबंद केले. दरम्यान, पोलिसांनी गराडा घातल्याचे लक्षात येताच गोडबोले यांनी आपण आत्मसमर्पण करणार असल्याचा मेसेज व्हायरल करून अटकनाट्याला वळण देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला.
एनटीपीसी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आणि मागण्यांच्या संबंधाने मौदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ३० जुलैच्या दुपारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खा. कृपाल तुमाने, उपविभागीय अधिकारी (महसूल) अविनाश कातडे, एनटीपीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक (मनुष्यबळ) राजकुमार प्रजापती, जनसंपर्क अधिकारी समीरकुमार चिमण लाल, जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले, शिवसेनेचे संदीप इटकेलवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
खा. तुमाने यांनी एनटीपीसीच्या दोन्ही अधिकाऱ्यांना विषयनिहाय प्रश्न विचारले. त्यावर राजकुमार प्रजापती यांनी आपण मौदा एनटीपीसी कार्यालयात नवीन असल्याने यासंदर्भात माहिती सांगतो, असे उत्तर दिले. ते टोलवाटोलवी करीत असल्याचे लक्षात आल्याने संतप्त झालेल्या खा. तुमाने यांनी प्रजापतींना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. ते बाहेर निघताच देवेंद्र गोडबोले आणि धामणगावचे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गोरले या दोघांनी प्रजापती यांच्याशी वाद घालून प्रजापती तसेच समीरकुमार यांना मारहाण केली.
समीर लाल यांचा मोबाईलही फोडला. त्यामुळे या बैठकीला वेगळीच कलाटणी मिळाली. वातावरण तणावपूर्ण झाले होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी आढावा बैठक सोडून त्यांचे कार्यालय गाठले आणि संपूर्ण घटनाक्रम एनटीपीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. अधिकाऱ्यांना चक्क मारहाण करण्यात आल्याच्या वृत्ताने एनटीपीसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या प्रकाराचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला. एनटीपीसी आॅफिसर्स असोसिएशन तसेच एनटीपीसी वर्कर्स युनियनने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन आरोपींना तातडीने अटक करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता.
पोलिसांकडे तक्रार, आरोपी फरार
या प्रकरणी राजकुमार प्रजापती यांच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी देवेंद्र गोडबोले व जितेंद्र गोरले यांच्याविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी आरोपी गोडबोले आणि गोरलेच्या अटकेसाठी धावपळ सुरू केली. आरोपींनी आपापले मोबाईल बंद करून ठेवल्याने पोलिसांनी त्यांच्या निकटस्थ व्यक्तींवर नजर रोखली.
अटकेची नाट्यमय घडामोड
या घटनेला सात दिवस झाले. मात्र, आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. दुसरीकडे या प्रकरणामागचे नेमके कारणही चर्चेला आले होते. त्यानुसार, गोडबोलेंच्या अवैध धंद्यांना, अवास्तव मागण्यांना एनटीपीसीचे अधिकारी दाद देत नसल्याने गोडबोले त्यांच्यावर चिडून होते. त्यामुळे एनटीपीसीत आपला दबदबा निर्माण करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे चर्चेतून पुढे आले.
दुसरीकडे सात दिवस होऊनही हाती लागत नसल्याने गोडबोलेंना अटक करण्यासाठी पोलिसांनी आपली शैली बदलवली होती. त्यानुसार, पोलिसांनी फरार असलेल्या गोडबोलेंची ‘व्यवस्था’ करणाऱ्या एका साथीदाराला शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्याला खास पद्धतीने ‘गरम ’केले. त्यानंतर त्याने गोडबोलेचा पत्ता सांगितला. त्यानुसार, रविवारी सकाळपासून गोडबोलेंच्या आजूबाजूला पोलिसांनी गराडा घालणे सुरू केले. त्याची कुणकुण लागताच गोडबोलेंनी मोबाईलवरून एक मेसेज व्हायरल केला. त्यात त्यांनी आपण पोलीस अधीक्षकांकडे आत्मसमर्पण करीत असल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्षात आज रविवार असल्यामुळे आणि एसपी आॅफिस बंद असल्यामुळे आत्मसमर्पणाचा प्रश्नच नव्हता. ग्रामीण पोलिसांनी त्यांना नागपुरात नाट्यमयरीत्या अटक करून गोडबोलेंच्या कथित आत्मसमर्पणाचा डाव उधळला.