शिवसेनेचा मुंबईत जीव, नागपुरात मात्र कीव

By admin | Published: February 6, 2017 02:00 AM2017-02-06T02:00:46+5:302017-02-06T02:00:46+5:30

भाजपला नागपुरात भुईसपाट करू ,अशी आव्हानाची भाषा करणाऱ्या नागपुरातील शिवसैनिकाला मुंबईतून रसद मिळण्याची शक्यता कमीच आहे.

Shivsena's life in Mumbai, but only in Nagpur | शिवसेनेचा मुंबईत जीव, नागपुरात मात्र कीव

शिवसेनेचा मुंबईत जीव, नागपुरात मात्र कीव

Next

मोठ्या नेत्यांची पाठ : स्थानिकांच्या भरवशावरच प्रचार
नागपूर : भाजपला नागपुरात भुईसपाट करू ,अशी आव्हानाची भाषा करणाऱ्या नागपुरातील शिवसैनिकाला मुंबईतून रसद मिळण्याची शक्यता कमीच आहे. शिवसेनेच्या सर्व दिग्गज नेत्यांचा जीव मुंबईत अडकला आहे. नागपूरकडे लक्ष द्यायला, नागपुरात प्रचारसभा घ्यायला कुणाकडेही वेळ नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांची कीव यावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक पदाधिकारी आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, बलाढ्य भाजपासमोर या प्रयत्नांना किती फळ मिळेल याची शंका आहे.
कुणी डिवचले की शिवसैनिक पेटून उठतो. विरोधकांवर तुटून पडतो. मात्र अशा वेळी त्यांना रसद पुरविण्याची, राजासह , सरदारांनी पाठबळ देण्याची गरज असते. नवे संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत यांनी नागपुरात येत शिवसैनिकांना हाक दिली. शिवसैनिक स्वबळावर लढून भाजपचे पानिपत करण्यासाठी सज्ज झाला. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर मुंबईकडून पाहिजे तशी मदत मिळण्याची शक्यता धुसर होऊ लागल्याने नाराजी पसरू लागली आहे. मुंबई जिंकल्यावर शिवसेनेची जेवढी वाहवाह होईल त्याहून अधिक चर्चा नागपुरात भाजपला रोखण्यात यश आले तर होईल, हे विसरून चालणार नाही, अशा भावना उमेदवार व कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
पक्षाशी बंडखोरी करून बाहेर पडलेले सावरबांधे यांना निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेतले. तिकीट वाटपात त्यांनी हस्तक्षेपही केला. ही बाब निष्ठावान कार्यकर्त्यांना पटलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. पक्षाला दगा देणाऱ्यांच्या भरवशावर आपण ही निवडणूक जिंकणार आहोत का, असा सवाल आता कार्यकर्ते करू लागले आहेत.(प्रतिनिधी)

शिवसेनेकडे उमेदवारांची यादीच नाही
काँग्रेस- भाजपमधील बंडखोरांची अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहिल्यानंतर मिळेल त्याला ए-बी फॉर्म देऊन शिवसेनेने आपल्या उमेदवारांची संख्या वाढविली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे ए-बी फॉर्म सोपविण्यात आले. काही ठिकाणी उशिरा फॉर्म पोहचले. त्यामुळे उमेदवारांना वंचित रहावे लागले. ए-बी फॉर्म वाटपात एवढा घोळ झाला की नेमके कोणत्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले याची माहिती पक्षाकडेही उपलब्ध नाही. पक्षाच्या नेत्यांना उमेदवार यादीबाबत विचारणा केली असता यादी तयार करण्याचे, माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी उत्तरे दोन दिवसांपासून दिली जात आहेत.

उद्धव ठाकरेंची सभा व्हावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत सभा घेऊन शिवसेनेवर तोफ डागणार आहेत. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची एकही सभा नागपुरात होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. उमेदवारांचे मनोबल उचावण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकतरी सभा नागपुरात व्हावी, मराठी सिनेकलांवंताचे नागपुरातही रोड शो व्हावे, अशी उमेदवारांची अपेक्षा आहे.

मंत्र्यांची फौज काय कामाची ?
भाजपने प्रचारात आपली मंत्र्यांची फौज उतरविली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात धुरा सांभाळून आहेत. दुसरीकडे शिवसेनेने मात्र आपल्या एकाही मंत्र्यावर नागपूरची जबाबदारी सोपविलेली नाही. भाजपकडे मंत्री आहेत तर शिवसेनेकडेही मंत्री आहेत. नागपुरात भाजपला आव्हान देणाऱ्या शिवसेनेला मंत्र्यांचे पाठबळ मिळणार नसेल तर मंत्र्यांची ही फौज काय कामाची, असा सवालही उमेदवार करू लागले आहेत.

Web Title: Shivsena's life in Mumbai, but only in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.