दोन्ही शहर प्रमुखांना शिवसेनेची नोटीस
By admin | Published: April 2, 2016 03:29 AM2016-04-02T03:29:12+5:302016-04-02T03:29:12+5:30
शिवसेनेतर्फे सेना भवनात आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून जिल्हा प्रमुख..
गटबाजी उफाळण्याची चिन्हे : संपर्क प्रमुखांसमोर होणार कारणमीमांसा
कमलेश वानखेडे नागपूर
शिवसेनेतर्फे सेना भवनात आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांनी मंगेश काशीकर व सूरज गोजे या दोन्ही शहर प्रमुखासह काही पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीमुळे पदाधिकारी कमालीचे दुखावले असून त्यामुळे पक्षात गटबाजी उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपुरात शिवसेनेची ताकद तुलनेत कमी आहे. नगरसेवकांची संख्याही कमी आहे. नागपूर शहराचे संपर्क प्रमुख आ. अनिल परब हे नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासून नागपुरात शिवसेनेचा भगवा घट्ट रोवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जुन्या शिवसैनिकांना कामाला लावण्यासाठी, पक्षातून बाहेर पडलेल्यांना पुन्हा परत आणण्यासाठी, पक्षाची बांधणी करण्यासाठी परब यांची धडपड सुरू आहे.मात्र, हे सर्व होत असताना दुसरीकडे गटबाजी उफाळू लागली आहे.
यावर्षी शिवसेनेतर्फे तिथीनुसार २६ मार्च रोजी शिवजयंती मोठ्या स्वरूपात साजरी करण्यात आली. रेशीमबागेतील सेना भवनातही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही काही पदाधिकारी या ना त्या कारणावरून शिवजयंती सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. या अनुपस्थितीची प्रभारी जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस म्हणजे शिस्तभंगाचा दस्तावेज मानला जातो. तोंडी फटकार चालतात पण फाईलला कागद लागणे हे कोणत्याही पक्षातील पुढील फळप्राप्तीसाठी गंभीर मानले जाते. त्यामुळेच जिल्हा प्रमुखांच्या नोटिसीमुळे शहर अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे. असे असले तरी दोन्ही शहरप्रमुखांनी आपल्याला कुठलीच नोटीस मिळाली नाही, असा दावा केला आहे. तर जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांनी पक्षांतर्गत विषयावर भाष्य करणार नाही, असे सांगून काहीही प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, पक्षातील काही जबाबदार पदाधिकारी नोटीस पाठविण्यात आल्याचा दावा करीत आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी तर नोटिसीला सडेतोड उत्तर देण्याची तयारी चालविली असल्याची माहिती आहे. संपर्क प्रमुख आ. अनिल परब पुढील आठवड्यात नागपुरात येण्याची शक्यता असून त्यांच्या उपस्थितीतच नोटिसीची कारणमीमांसा होण्याची शक्यता आहे.