आठवले गटाला शिवसेनेची टाळी

By admin | Published: February 2, 2017 02:05 AM2017-02-02T02:05:54+5:302017-02-02T02:05:54+5:30

भाजपा-शिवसेना युती तुटल्यानंतर दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. मुंबई काबीज करण्यासाठी

Shivsena's Tally of Athavale Group | आठवले गटाला शिवसेनेची टाळी

आठवले गटाला शिवसेनेची टाळी

Next

उल्हासनगर पॅटर्ननुसार युतीची शक्यता : भाजपला रोखण्यासाठी खेळी
नागपूर : भाजपा-शिवसेना युती तुटल्यानंतर दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. मुंबई काबीज करण्यासाठी भाजपा आपली पूर्ण शक्ती पणाला लावत आहे. याच पार्श्वभूमीवर सेनेने सुद्धा भाजपचा गड असलेल्या नागपूरवर लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित करून याबाबतचे स्पष्ट संकेत दिले होते. आता नागपुरात भाजपचे मित्र पक्ष असलेल्या रिपाइं (आठवले) गटाला भाजपापासून तोडून आपल्यासोबत जोडण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न चालविले आहे. याचाच एक भाग म्हणून आज शिवसेनेने रिपाइं (आ)च्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ही चर्चा अतिशय समाधानकारक राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागपुरात उल्हासनगर पॅटर्नप्रमाणे शिवसेना-रिपाइं(आ)ची युतीची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेनेचे नागपूर निवडणूक संपर्क प्रमुख आ. सावंत हे बुधवारी नागपुरात होते. त्यांनी खास हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे रिपाई (आठवले)च्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून घेतले. रिपाइं (आ) चे शहराध्यक्ष राजन वाघमारे व इतर दोघे पदाधिकारी तसेच शिवसेनेतर्फे शेखर सावरबांधे व निलावार हे उपस्थित होते. बराच वेळ ही चर्चा चालली. यावेळी शिवसेनेतर्फे नागपुरात पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्यात येणार असून रिपाइं(आ) लाही सोबत घेण्याचे आवाहन केले. शिवशक्ती व भीमशक्ती ही एकत्र यावी, अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. रामदास आठवलेंनी सुद्धा त्याला साथ दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच उल्हासनगरमध्ये शिवसेनेची आठवले यांच्यासोबतच युती आहे. या पॅटर्ननुसार नागपुरातही युती करावी, असे आवाहन करण्यात आले.
रिपाइं (आठवले) गटाने नागपुरात भाजपासोबत युती केली आहे. उमेदवारांची यादी सुद्धा दिलेली आहे. परंतु अजूनही जागावाटपाबाबात अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच आठवले गटाला नागपुरात भाजपा फार काही जागा देणार नाही, अशी चर्चा आहे. रिपाइं (आठवले) गटाच्या स्थानिक नेत्यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळेच शिवसेनेकडून आलेल्या प्रस्तावाचे रिपाइंच्या नेत्यांनी सुद्धा समर्थन करीत त्यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये बराच वेळ ही चर्चा चालली. यावेळी रिपाइं (आठवले)तर्फे २७ उमेदवारांची यादी सुद्धा शिवसेनेला देण्यात आली. शिवसेनेतर्फे आठवले गटाच्या सर्व अटी मान्य करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Shivsena's Tally of Athavale Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.