लाखोंचा घोटाळा झालेली शिवशाही ६९४ दिवसांत फक्त २५ वेळा तपासली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2023 08:10 AM2023-01-05T08:10:00+5:302023-01-05T08:10:01+5:30
Nagpur News शिवशाही बसेसच्या स्पॉट बुकिंग घोटाळ्यात अडकलेल्या एसटीच्या वाहतूक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अद्यापही कारवाई झालेली नसल्यामुळे महामंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दयानंद पाईकराव
नागपूर : नागपूर-भंडारा मार्गावर नॉन स्टॉप धावणाऱ्या शिवशाही बसेसच्या स्पॉट बुकिंगमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या घोटाळ्यात अडकलेल्या एसटीच्या वाहतूक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अद्यापही कारवाई झालेली नसल्यामुळे महामंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे घोटाळा झालेल्या नागपूर-भंडारा मार्गावरील शिवशाही बसेस १ जानेवारी २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान ६९४ दिवसांपैकी फक्त २५ वेळाच तपासण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागातील अधिकारी आणि मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांची या घोटाळ्यात मोठी भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. दोन वर्षांत केवळ २५ वेळाच नागपूर-भंडारा मार्गावरील शिवशाही बसेस तपासण्यात आल्याची बाब भंडारा येथील विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार जैन यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीतून स्पष्ट झाली आहे. नागपूर-भंडारा मार्गावरील शिवशाही बसेसच्या बुकिंगचे कंत्राट मिळालेल्या ट्रायमॅक्स कंपनीच्या स्थानिक एजंटने लाखो रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब उजेडात आल्यानंतर या कंपनीच्या एजंटने ठेवलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. परंतु, या घोटाळ्यातील एजंट, एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभय देण्यात येत आहे. प्रवाशांकडून संपूर्ण प्रवासाचे भाडे वसूल करून त्यांना विविध सवलतींच्या नावाखाली शून्य पैशांचे तिकीट देऊन एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाची लाखो रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत मौदा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. परंतु, या घोटाळ्यात सामील असलेल्या एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यामुळे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दोन वर्षांत केवळ २५ वेळा तपासणी
नागपूर-भंडारा मार्गावर १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात ३६५ दिवसांपैकी केवळ सहा दिवस १४ बसेसची तपासणी करण्यात आली. लॉकडाऊनचे सहा महिने सोडले तरी इतर काळात स्पॉट बुकिंग सुरू होते. १ जानेवारी २०२१ ते २५ फेब्रुवारी २०२१ व २८ मार्च २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात एकही बस तपासण्यात आली नाही. त्याचप्रमाणे जानेवारी २०२२मध्ये ३१ दिवसांत एकही बस तपासण्यात आली नाही. १ जानेवारी ते २५ नोव्हेंबर २०२२ या ३२९ दिवसांत फक्त १९ वेळा शिवशाही बस तपासण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.
असा झाला होता घोटाळा उघड
एसटीच्या भंडारा मार्गावरील नॉन स्टॉप शिवशाही बसेसचे स्पॉट बुकिंग करण्यात येते. नागपुरातून बस सुटल्यानंतर ती थेट भंडारा येथेच थांबते. परंतु, २६ सप्टेंबर २०२२ रोजी एसटी महामंडळाच्या भंडारा विभागातील मार्ग तपासणी पथकाने नागपूर-भंडारा शिवशाही बस तपासली. यात कुठल्याच सवलतीत बसत नसलेल्या प्रवाशांना शून्य पैशांचे तिकीट देण्यात आल्याची धक्कादायक माहिती पथकाच्या लक्षात आली होती.
सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
‘एसटीच्या नागपूर-भंडारा मार्गावरील शिवशाही बसेसच्या स्पॉट बुकिंगमध्ये झालेल्या घोटाळ्याची एसटीच्या सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.’
- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
..........