ढोल-ताशांच्या गजरात निघाली शोभायात्रा
By admin | Published: June 8, 2017 02:55 AM2017-06-08T02:55:59+5:302017-06-08T02:55:59+5:30
श्रीशिवराज्याभिषेक समारोह समिती, महाल आणि सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा
शिवराज्याभिषेक दिन सोहळा : स्वयंसेवकांनी दिली अस्त्र-शस्त्रांची सलामी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रीशिवराज्याभिषेक समारोह समिती, महाल आणि सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी मयूर रथावर स्वार श्रीछत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ढोल, ताशा, भगवा ध्वज आणि शंखध्वनीच्या निनादात काढण्यात आली.
ही शोभायात्रा महालातील शिवाजी महाराज चौक, न्यू इंग्लिश हायस्कूलमार्गे चिटणीस पार्क येथे पोहोचली. या शोभायात्रेत सहभागी स्वयंसेवक पारंपरिक पोषाखात नृत्य करीत चालत होते. पुरुषांनी भगवा वेस्ट कोट, पायजामा तर महिलांनी नऊवारी घातली होती.
या शोभायात्रेत ढोल-ताशा व ध्वजपथक प्रतिष्ठानचे शेकडो स्वयंसेवक ढोल व ताशा वाजवत होते. अश्वावर स्वार जीजाऊ यांची भूमिका आस्था दहीकर आणि अश्विनी चव्हाण यांनी साकारली. याशिवाय अनेक बालक शिवरायांच्या वेशभूषेत या शोभायात्रत सहभागी झाले होते. ही शोभायात्रा गांधीसागर तलाव, टिळक पुतळा होत सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. येथे युवकांनी अस्त्र-शस्त्राद्वारे सलामी दिली. आतशबाजीही करण्यात आली. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र माझा, भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण महाल परिसर दणाणून गेला. या शोभायात्रेत संयोजक दत्ता शिर्के, श्रेया ठाकरे, मृणालिनी जोशी, अभिषेक कळमकर, चेतन कोलते, अक्षय ठाकरे, सचिन गुजर, जय आसकर, विवेक पोहाणे, प्रवीण घरजाळे, सचिन गुरव सहभागी झाले होते. पालखीत विराजित शिवाजी महाराज आणि चौकातील प्रतिमेला वैदिक मंत्रोच्चारात जल, पंचामृताने अभिषेक घालण्यात आला. वैदिक विद्वान श्रीकांत गोडबोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेश वंदना म्हटली. यावेळी संभाजी महाराजांच्या तैलचित्राला माल्यार्पण केले गेले. मुलींनी शिवाजी महाराजांची महाआरती म्हटली. तोफेद्वारे रंगीबेरंगी फुले उधळण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, सद्गुरुदास महाराज (विजयराव देशमुख), राजे मुधोजी भोसले, नगरसेवक हर्षला साबळे, सुमंत टेकाडे, शिरीष राजे शिर्के उपस्थित होते. शिवसाम्राज्य ढोल व ताशा पथकाचे नेतृत्व नीलेश गावंडे यांनी केले.
स्वयंसेवकांनी केली शिवगर्जना
या पथकात सुमारे ८० स्वयंसेवक सहभागी झाले होते. शिवमुद्रा पथकाचे सुमारे २०० ते २५० स्वयंसेवक विशेष धून वाजवत होते. शिवगर्जनाचे ४० स्वयंसेवक भगवा ध्वज फडकवत चालले होते. अन्य पथकांमध्ये शिवप्रतिष्ठा, शिवगर्जना, शिवसंस्कृती, भवानी, शिवाज्ञा, शिवछत्र, स्वराज्य गर्जना, गजवक्र, ब्रह्मनाद, शिवरुद्र, रौद्र तांडव, मार्दव, योद्वा, शिवप्रताप, भृशुंड, शिवसमर्थ, लेझिम पथक आणि जिजाऊ वाघनी स्त्री आत्मसंरक्षण दलाचा समावेश होता. या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी संयोजक दत्ता शिर्के, जयंत बैतुले, स्वप्नील इंगळे, दिलीप दिवटे, श्रीनेश पाटील, गौरव शिंदे, रितेश पांडे,नीलेश गावंडे, शशांक गायकवाड़, प्रवीण घरजाळे, अभिषेक कळमकर, विशाल देवकर यांनी परिश्रम घेतले.