शोभना बंडोपाध्यायने स्वीकारला दपूम रेल्वेच्या ‘डीआरएम’पदाचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:34 AM2018-04-21T01:34:37+5:302018-04-21T01:34:49+5:30
शोभना बंडोपाध्याय यांनी शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शोभना बंडोपाध्याय यांनी शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला. भारतीय रेल्वे सिग्नलिंग इंजिनिअरिंग सेवेच्या १९८७ च्या बॅचच्या अधिकारी बंडोपाध्याय यांनी मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भोपाळ येथून बीटेक केले आहे. त्यांना प्लॉनिंग डिझाईन आणि कंट्रोल, मेन्टेनन्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा २९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय रेल्वेत त्या एक विशिष्ट महिला अभियंता आहेत. त्यांनी रेल्वेला आपली बहुमूल्य सेवा दिली आहे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यापूर्वी त्या उत्तर रेल्वे, नवी दिल्लीच्या दूरसंचार विभागाच्या विभाग अध्यक्ष होत्या. त्यांनी मध्य रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वेसारख्या विविध झोनल रेल्वे आणि रेल्वे संघटनात अनेक महत्वाच्या पदावर कार्य केले आहे. सोबतच भारत आणि विदेशात प्रशिक्षण प्राप्त केले आहे. त्या भारतीय रेल्वेच्या १ हजार किलोमीटरच्या रुट किलोमीटरपेक्षा अधिक मूलभूत प्रकल्पांशी निगडित राहिल्या आहेत. त्यांनी अनेक रेल्वेस्थानकांच्या सिग्नलिंग यंत्रणेला आधुनिक करण्यात एक महत्त्वाची उपलब्धी प्राप्त केली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत बहुतांश ग्रामीण भागात सुरु असलेल्या विकासकामात त्यांच्या अनुभवाचा लाभ होणार आहे.त्यांनी विविध पदांवर कार्य करताना संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय रेल्वेत सिग्नल आणि टेलिकॉमच्या तंत्रज्ञानात सुधारणा घडविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.