लॉकडाऊनचा धसका; मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील मजुरांनी पुन्हा सोडले नागपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:49 AM2021-03-16T10:49:17+5:302021-03-16T10:49:38+5:30
Nagpur News गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन लॉकडाऊन लागताच परराज्यातील अनेक मजुरांनी आपापल्या गावी पलायन केले. यात मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथील मजुरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन लॉकडाऊन लागताच परराज्यातील अनेक मजुरांनी आपापल्या गावी पलायन केले. यात मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथील मजुरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
नागपुरात मोठ्या प्रमाणावर परराज्यातील मजूर आहेत. यात लगतच्या राज्यातील आणि विशेषत: मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथील मजुरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. स्थानिक मजुरांच्या तुलनेत मजुरी कमी असल्याने नागपुरातील बहुतांश बांधकामांवर हेच मजूर दिसून येतात. गतवर्षी लागलेल्या लॉकडाऊनमध्ये या मजुरांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. शेकडो मैल पायी जावे लागले. नंतर प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या गेल्या तरी त्यापूर्वी या मजुरांना बरेच कष्ट सोसावे लागले. यावेळचा लॉकडाऊन हा केवळ सात दिवसांचा आहे. यातही लॉकडाऊनमध्ये बांधकाम व कारखाने सुरू आहेत. परंतु, रस्त्यावर आल्यास पोलिसांचा मोठा त्रास होतो. हा अनुभव गेल्या वर्षी अनुभवला असल्याने यावेळी लॉकडाऊनची घोषणा होताच मजुरांनी आपापल्या गावांची वाट धरायला सुरुवात केली.
पालकमंत्र्यांनी गुरुवारी लॉकडाऊनची घोषणा केली. शुक्रवारी मजुरांनी काम केले. शनिवार व रविवारी बहुतांश मजूर आपापल्या गावी रवाना झाले. छत्तीसगढ व मध्य प्रदेशात नागपुरातून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक आहे. त्यानुसार काही जणांनी शुक्रवारीच तपासणी करून घेतली आणि शनिवारी-रविवारी रिपोर्ट घेऊन आपापल्या गावी निघाले.
मजुरांसाठी ठेकेदारांची धावपळ
शहरात अनेक ठिकाणी घरांची कामे सुरू आहेत. या कामांवरही परराज्यातील मजूर मोठ्या प्रमाणावर कामाला आहे. शनिवारपर्यंत बऱ्याच ठिकाणी मजूर कामावर आले. परंतु, रविवारी मजूर कामावरच आले नाहीत. सोमवारी ही संख्या आणखी घटली. लॉकडाऊनच्या धास्तीने मजूर गावी परत गेल्याचे समजताच ठेकेदारांना कामासाठी स्थानिक मजूर मिळविण्यासाठी धापवळ करावी लागली.