चुकीचे ऑईनमेंट देणाऱ्या ‘मेडिकल स्टोअर’ला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:34 AM2019-01-07T10:34:24+5:302019-01-07T10:36:44+5:30
महिला ग्राहकास चेहऱ्यावर लावायला चुकीचे ऑईनमेंट दिल्यामुळे मौदा तालुक्यातील तारसा येथील सौरभ मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार मंचने जोरदार दणका दिला आहे. ग्राहकास १ लाख १५ हजार रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला ग्राहकास चेहऱ्यावर लावायला चुकीचे ऑईनमेंट दिल्यामुळे मौदा तालुक्यातील तारसा येथील सौरभ मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार मंचने जोरदार दणका दिला आहे. ग्राहकास १ लाख १५ हजार रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश मेडिकलला देण्यात आला आहे.
पल्लवी झाडे असे महिला ग्राहकाचे नाव असून त्या धानला, ता. मौदा येथील रहिवासी आहेत. सौरभ मेडिकलने दिलेल्या चुकीच्या ऑईनमेंटमुळे त्यांचा चेहरा विद्रुप झाला आहे. मंचने त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १ लाख, उपचारावरील खर्चापोटी ५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. सौरभ मेडिकलला या आदेशाचे पालन करण्यासाठी ३० दिवासाची मुदत देण्यात आली आहे. अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व दीप्ती बोबडे यांनी हा निर्णय दिला.
तक्रारीतील माहितीनुसार, २६ नोव्हेंबर २०१५ रोजी झाडे यांना रामटेक येथील डॉ. पौर्णिमा लोधी यांनी चेहऱ्यावर लावण्यासाठी ‘अॅलॉईडर्म’ ऑईनमेंट लिहून दिले होते. ते ऑईनमेंट खरेदी करण्यासाठी त्या सौरभ मेडिकलमध्ये गेल्या असता त्यांना ‘अॅलॉईडर्म’ ऐवजी ‘डेरोबिन’ ऑईनमेंट देण्यात आले. झाडे यांनी त्याबाबत विचारणा केली असता त्यांना दोन्ही ऑईनमेंटमधील कन्टेन्टस् सारखे असून केवळ कंपन्या वेगळ्या आहेत व त्यामुळे काहीच फरक पडणार नाही असे सांगण्यात आले. तसेच, झाडे यांना पक्के बिल देण्यात आले. परंतु, ‘डेरोबिन’ ऑईनमेंट लावल्यानंतर झाडे यांच्या चेहऱ्यावर लालसर डाग पडले व त्यांचा चेहरा काळा झाला. त्यानंतर त्यांनी भंडारा येथील डॉ. विनय रहांगडाले यांच्याकडे तपासणी केली असता ‘डेरोबिन’ ऑईनमेंटमुळे रिअॅक्शन झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. परिणामी, त्यांनी भरपाईसाठी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने नोटीस बजावल्यानंतर सौरभ मेडिकलने उत्तर दाखल करून झाडे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. अंतिम सुनावणीनंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्णय दिला.
हा तर बेजबाबदारपणा
ग्राहकांना औषधे देताना काळजी घेणे आवश्यक आहे. हे काम अत्यंत जबाबदारीचे आहे. परंतु, सौरभ मेडिकलने बेजबाबदार व निष्काळजीपणाची कृती केल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून सिद्ध होते. तसेच, त्यांनी अनुचित व्यापार पध्दतीचाही अवलंब केला आहे असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदविले.