चारसौ चालीस का झटका; ३५ कुटुंबांना प्रत्येकी चार लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 07:39 PM2022-08-17T19:39:35+5:302022-08-17T19:39:58+5:30
Nagpur News पावसाळ्यात वीज शॉक लागू मृत्यूच्या घटना वाढतात. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यात दोन वर्षात ३५ जणांचा मृत्यू वीज पडून झाला आहे.
नागपूर : पावसाळ्यात वीज शॉक लागू मृत्यूच्या घटना वाढतात. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यात दोन वर्षात ३५ जणांचा मृत्यू वीज पडून झाला आहे. यात गेल्या वर्षी २१ जणांचा तर यंदा आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू हा विजेने झाला आहे. या सर्वांच्या वारसांना चार लाखाचे अनुदान मिळाले आहे.
पावसाळ्यात नैसर्गीक आपत्तीसह वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना घडत असतात. या घटना प्रामुख्याने जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात घडत असतात. यातही सर्वाधिक वीज पडून मृत्यूच्या घटना या शेतात होत असल्याचे दिसून येते. मागील दोन वर्षात ३६ जणांना वीज पडून आपला जीव गमवावा लागला. प्रशासन स्तरावर अशा सर्वांच्या वारसांना नुकसान भरपाई प्रदान करण्यात आल्याचे सांगितले जाते. यासोबत वीज पडल्याने जखमी होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. दोन वर्षात तब्बल २९ जण यात जखमी झाले आहेत.
२०२१ मध्ये २१ मृत्यू
मागच्या वर्षी २०२१ मध्ये नैसर्गीक आपत्तीमुळे एकूण २७ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २१ जणांचा मृत्यू हा वीज पडून झाला. ५ जण पुरात वाहून गेले. तर एक जण भिंत पडून मरण पावला.
२०२२ मध्ये १४ मृत्यू
२०२२ मध्ये १ जूनपासून १७ ऑगस्टपर्यंत १४ जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची शासन दरबारी नोंद आहे.
१४२ जनावरांचा मृत्यू
नैसर्गीक आपत्तीमुळे एकूण १४२ जनावरांचाही मृत्यू झाला. यात बकरीपासून तर गायीपर्यंत सर्व प्रकारच्या जनावरांचा समावेश आहे. यासोबत ३१० कोंबड्याही मृत्यूमुख पडल्याची नोंद आहे. कोंबड्यांच्या मृत्युंची संख्या यापेक्षा कितीतरी मोठी असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. नियमानुसार ३ हजारापासून तर ३० हजारापर्यंतच्या जनावरांसाठीची मदत देण्यात आलेली आहे. तसेच कोंबड्यांचीही मदत वितरित झाल्याचे सांगितले जाते.
पावसाळ्यात घ्या काळजी
- वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच किंवा सुरक्षतेच्या ठिकाणी राहा
- शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नका
- वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिक उपकरणे बंद ठेवावी
- अतिवृष्टी व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नका
- चार चाकी वाहनामध्ये असाल तर दारे खिडक्या पूर्ण बंद ठेवा व धातू असलेल्या वाहनाच्या भागाला स्पर्ष करू नका.