वाढलेल्या वीज बिलामुळे नागरिकांना शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:16 PM2019-07-02T23:16:16+5:302019-07-02T23:17:31+5:30
जून महिन्याचे विजेचे बिल येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बिलाची भरमसाट रक्कम पाहून नागरिकांना शॉक लागण्याची वेळ आली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनच्या बिलात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात पोहचत आहेत. मीटर बदलून देण्याची मागणीही केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जून महिन्याचे विजेचे बिल येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बिलाची भरमसाट रक्कम पाहून नागरिकांना शॉक लागण्याची वेळ आली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनच्या बिलात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात पोहचत आहेत. मीटर बदलून देण्याची मागणीही केली जात आहे.
महावितरण व तिची फ्रेंचायसीने मात्र वीज बिलात कुठलाही घोळ नसल्याचा दावा करीत जून महिन्यात विजेचा वापर वाढल्यामुळे बिलात वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. उन्हाळ्यात साधारणत: विजेच्या बिलात वाढ होते. मात्र, या वर्षी यात झालेली अधिकची वाढ पाहून नागरिक हैराण आहेत. ज्यांचे बिल एक हजार रुपये येत होते त्यांना १५०० ते १६०० रुपये बिल आले आहे. तर सहा ते सात हजार बिल येणाऱ्यांचे बिल दहा हजारावर पोहचले आहे. यामुळे मीटरमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नागरिक विजेचे बिल घेऊन महावितरणच्या कार्यालयात पोहचत असून मीटर व बिलाची तपासणी करण्याची मागणी करीत आहेत.
सुट्यांमध्ये बाहेर, तरिही बिल वाढले
आपण कुटुंबियांसोबत उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये बाहेरगावी गेलो होतो, असे असतानाही विजेचे बिल भरमसाट आले आहे, अशाही तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
सुरक्षा ठेवीचा पेच
महावितरण दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यात सुरक्षा ठेवीवर व्याज देते. यावर्षी चुकीने दोनदा व्याज देण्यात आले. चूक लक्षात आल्यावर महावितरणने अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला. याचाही परिणाम वीज बिलावर झाला आहे.