नकली पोलिसांचा नागपूरच्या असली पोलिसांना शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 09:34 AM2018-01-09T09:34:45+5:302018-01-09T09:38:34+5:30
नकली पोलिसांनी सोमवारी सकाळी अडीच तासात सेवानिवृत्त अभियंता आणि बँकेच्या अधिकाऱ्यासह चौघांना लुटले. त्यांच्याजवळचे ४३ हजार रुपये आणि १ लाखाचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे पोलीस विभागही हादरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नकली पोलिसांनी सोमवारी सकाळी अडीच तासात सेवानिवृत्त अभियंता आणि बँकेच्या अधिकाऱ्यासह चौघांना लुटले. त्यांच्याजवळचे ४३ हजार रुपये आणि १ लाखाचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे पोलीस विभागही हादरले आहे.
आयकर कॉलनी येथील ६९ वर्षीय अनंत दहीगावकर हे सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत. ते सकाळी ९ वाजता फिरून पायी घरी जात होते. बजाजनगर पोलीस ठाणे हद्दीतील बुटी ले-आऊट येथे बाईकवर ३५ ते ४० वर्षे वयोगटातील दोन व्यक्तींनी त्यांना रोखले. त्यांनी स्वत:चा परिचय एक्साईज आॅफिसर म्हणून दिला. एकाने स्वत:चे ओळखपत्रही दाखविले. एका वृद्ध व्यक्तीजवळ गांजा सापडल्याचे सांगत तुम्हीसुद्धा वृद्ध आहात म्हणून तुमची तपासणी करायची असल्याचे सांगत पैसे आणि दागिने एका रुमालमध्ये काढून ठेवण्यास सांगितले. दहीगावकर यांनी तसेच केले. त्यांनी दागिने (दोन अंगठ्या) व ६५०० रुपये व घड्याळ आरोपीच्या स्वाधीन केली. आरोपींनी त्यांना घड्याळ व एक अंगठी परत केली; परंतु ३० हजार रुपयाची अंगठी लंपास केली. त्यांना रुमाल बांधून खिशात ठेवण्यास सांगितले. घरी आल्यावर दहीगावकर यांना दागिने लंपास केल्याचे समजले.
दुसरी घटना सकाळी १०.३० वाजता सोनेगाव येथील मनीषनगरात घडली. परसोडी येथील ६५ वर्षीय पुंडलिक वाघमारे हे लहान भाऊ नामदेवसोबत दुचाकी दुरुस्त करण्यासाठी गॅरेजमध्ये जात होते. त्यांना २५ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांनी रोखले. त्यांनी स्वत:ला पोलीस असल्याचे सांगत ‘आम्ही चरस-गांजा पकडला आहे. लोकांची चौकशी केली जात आहे. तुमचीही चौकशी करायची आहे’असे म्हणत पुंडलिक वाघमारेला अंगठी आणि चेन काढून रुमालमध्ये ठेवण्याचे नाटक केले. रिकामा रुमाल त्यांच्या स्वाधीन केला व दागिने घेऊन लंपास झाले.
तिसरी घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीतील जयताळा मार्गावर घडली. भाऊसाहेब सुर्वे नगरनिवासी ६० वर्षीय भालचंद्र जैन हे महावितरणचे सेवानिवृत्त अभियंता आहेत. जैन हे बँकेतून घरी परत जात होते. रस्त्यात दोघांनी त्यांना रोखले. स्वत:ला पोलीस असल्याचे सांगितले. एका कपड्याच्या व्यापाऱ्याकडे गांजा सापडला आहे. त्यामुळे सर्वांची चौकशी सुरू आहे, असे म्हणत जैन यांची झडती घेऊ लागले. जैन यांचे ५० हजाराचे दागिने काढून रुमालमध्ये ठेवायला लावले. दागिने स्वत:कडे ठेवून खाली रुमाल परत केला. चौथी घटना सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील कैलाशनगर येथे घडली. न्यू अमरनगर येथील दिलीप कावडकर सिंचन विभागात कर्मचारी आहेत. ते जलकर वसुली करून परत येत होते. न्यू कैलाशनगर मार्गावर त्यांना एका युवकाने रोखले. त्यानेही स्वत:ला पोलीस असल्याचे सांगत, समोर चरस-गांजाच्या तस्करांची चौकशी सुरू आहे. आम्हीही चौकशी करीत आहोत. तुमचीही झडती घ्यायची आहे, असे म्हणत झडती घेऊ लागला. दरम्यान त्याचा एक साथीदार आला. त्याने कावडकर यांच्याकडील वसुलीचे ४३ हजार रुपये लंपास केले.