धक्कादायक! नागपुरात ११ दिवसात ११८ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 07:57 PM2020-08-05T19:57:09+5:302020-08-05T20:02:00+5:30
२६ जुलै ते ४ ऑगस्ट या ११ दिवसात ११८ मृत्यू झाले आहेत. मृतांची वाढती संख्या चिंतेचे कारण ठरत आहे. प्राथमिक अहवालानुसार, ‘को-मॉर्बिडिटी’ म्हणजेच ज्या लोकांना दीर्घकाळ मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, काहींना हृदयविकार आहे, मूत्रपिंडाचा आजार आहे किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वय आहे अशा रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाने घेतलेला पहिला बळी ४ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६४ वर्षीय पुरुषाचा होता. २९ एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील ७० वर्षीय पुरुषाचा दुसरा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडा वाढतच गेला. मे महिन्यात ९, जून महिन्यात १४, जुलै महिन्यात १०१ तर गेल्या चार दिवसात ६३ मृतांची नोंद झाली. विशेष म्हणजे २६ जुलै ते ४ ऑगस्ट या ११ दिवसात ११८ मृत्यू झाले आहेत. मृतांची वाढती संख्या चिंतेचे कारण ठरत आहे. प्राथमिक अहवालानुसार, ‘को-मॉर्बिडिटी’ म्हणजेच ज्या लोकांना दीर्घकाळ मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, काहींना हृदयविकार आहे, मूत्रपिंडाचा आजार आहे किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वय आहे अशा रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येक रुग्णाचा मृत्यू होत नाही.
जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत ६,४८३ रुग्ण बाधित झाले असून, यातील ३,८७४ रुग्ण बरे झाले आहेत. १८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ११ दिवसांतील मृतांमध्ये नऊ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. राज्यातील हा सर्वात कमी वयाचा मुलगा होता. त्याला ‘क्वॉड्री पॅरालिसिसी’ हा जुनाट आजार होता. उर्वरित मृत २० ते ८५ वयोगटातील आहेत. यात २० व २५ वर्षीय गर्भवती महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. यात २० वर्षीय गर्भवतीचा रक्तदाब वाढल्याने झटके येत होते. हे झटके एकामागून येत असल्याने प्रसूती करून झटक्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिचा मृत्यू झाला. दुसरी २५ वर्षीय महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. कोविडच्या संसर्गामुळे तिची दोन्ही फुफ्फुसे खराब झाली होती. याच दरम्यान तिची नॉर्मल प्रसूती झाली. परंतु दोन दिवसात तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोविडच्या गंभीर संसर्गामुळे झाला असावा, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. चाळिशीच्या आतील चार रुग्णांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गासोबतच उच्च रक्तदाब, हृदयाचा विकार व लठ्ठपणा यामुळे झाल्याचे प्राथमिक अहवालातून दिसून येते. उर्वरित मृतांमध्ये अनियंत्रित व जुनाट मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, श्वसनाचा आजार, मूत्रपिंड व यकृताचा आजार असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांनुसार, ज्यांना जुने आजार आहेत व ते अनियंत्रित आहेत त्यांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे.
४० ते ६० वयोगटात मृतांचे प्रमाण जास्त
गेल्या ११ दिवसात ४० ते ६० या वयोगटात मृतांचे प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञांनुसार, याच वयात बहुतांश लोकांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार होतात. या वयात कुटुंबाची अधिक जबाबदारी त्यांच्यावर राहत असल्याने या आजाराकडे दुर्लक्ष होते. शिवाय, इतर लोकांच्या अधिक संपर्कात येत असल्यामुळे विषाणूंच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त संभवतो.
केवळ कोविडमुळे मृत्यूचे प्रमाण कमी
तज्ज्ञांनुसार, केवळ कोविडमुळेच होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. सर्वच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे म्हणजे फुफ्फुसाला झालेल्या इन्फेक्शनमुळे होत नाही. सुरुवात तिथून होते आणि मग इतर गुंतागुंत वाढून जीव जातो.
छोट्याशा छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
छोट्याशा छोट्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन उपचार न घेतल्याने मृतांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, ताप, सर्दी, खोकला व इतरही लक्षणे असलेल्यांनी स्वत:हून औषध घेऊ नये. औषध घेतल्याने बरे झालेले काही रुग्ण पाच ते सात दिवसानंतर अचानक अस्वस्थ होऊन रुग्णालयात येत आहेत. यातील काही रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह येत असून, २४ ते ४८ तासात त्यांचा मृत्यू होत आहे. यामुळे कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविडची तपासणी करून घ्या, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासून घ्या.
डॉ. राजेश गोसावी विभागप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल