धक्कादायक ! १४ टक्के मृत ‘कोरोना’बाधित : सहा महिन्यातील आकडेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 09:40 PM2020-11-04T21:40:58+5:302020-11-04T21:42:48+5:30
Death percentage due to Corona ‘कोरोना’च्या विळख्यातून अद्यापही नागपूरची सुटका झालेली नसून, एप्रिलपासून शहराने अक्षरश: मृत्यूची दहशत अनुभवली. सहा महिन्यात झालेल्या एकूण मृत्यूपैकी सुमारे १४ टक्के लोक ‘कोरोना’मुळे गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या विळख्यातून अद्यापही नागपूरची सुटका झालेली नसून, एप्रिलपासून शहराने अक्षरश: मृत्यूची दहशत अनुभवली. सहा महिन्यात झालेल्या एकूण मृत्यूपैकी सुमारे १४ टक्के लोक ‘कोरोना’मुळे गेले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत नागपुरात किती जन्म व मृत्यू झाले, ‘लॉकडाऊन’ कालावधीत हे प्रमाण किती होते व किती ‘कोरोना’बाधितांचे दहनघाटांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मनपाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत नागपूर शहरात १४ हजार ७९६ मृत्यू झाले. यात ८ हजार ९९९ पुरुष व ५ हजार ७९७ महिलांचा समावेश होता. या काळात ‘कोरोना’मुळे मृत्यू पावलेल्या २ हजार १३४ लोकांचे दहनघाटांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यात १ हजार ३ महिलांचा समावेश होता.
सुरुवातीच्या चार महिन्यात ‘कोरोना’मुळे झालेल्यांच्या अंत्यसंस्कारांची संख्या कमी होती. मात्र ऑगस्टमध्ये आकडा ९८ वरून थेट १ हजार २३१ वर गेला. तर सप्टेंबर महिन्यात हीच संख्या सर्वाधिक १ हजार ३८७ इतकी होती.
‘लॉकडाऊन’च्या कालावधीत २० हजार जन्म
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत शहरात २० हजार ५८२ जन्म झाले. यात १० हजार ७१९ मुले तर ९ हजार ८६३ मुलींचा समावेश होता. दर महिन्याला सरासरी ३ हजार ४३० जन्म झाले. मागील वर्षी हीच सरासरी ४ हजार ५९१ इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत दर महिन्याच्या सरासरीमध्ये हजारहून अधिक घट झाली.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे दहन
महिना - पुरुष - महिला
मार्च - ० - ०
एप्रिल - ३ - ०
मे - ६ - ४
जून - ११ - ३
जुलै - ७१ - २४
ऑगस्ट - ६५६ - ५७५
सप्टेंबर - ९९० - ३९७