धक्कादायक! उपराजधानीत महिनाभरात मेंदूज्वराचे १५ बळी; नवा व्हायरस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 10:41 AM2019-08-07T10:41:28+5:302019-08-07T10:43:30+5:30

‘इन्सेफेलायटिस’ म्हणजेच ‘मेंदूज्वराची एकट्या जुलै महिन्यात मेयो व मेडिकलमध्ये २० बालक आढळून आली असून यातील १५ बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व बालक नागपूर ग्रामीणसह विदर्भ व दोन मध्य प्रदेशातील आहेत.

Shocking! 15 cases of brain fever in Nagpur | धक्कादायक! उपराजधानीत महिनाभरात मेंदूज्वराचे १५ बळी; नवा व्हायरस?

धक्कादायक! उपराजधानीत महिनाभरात मेंदूज्वराचे १५ बळी; नवा व्हायरस?

Next
ठळक मुद्देआणखी २० रुग्णांची नोंदमेडिकलला १४ तर मेयोत एका बालकाचा मृत्यू

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘इन्सेफेलायटिस’ म्हणजेच ‘मेंदूज्वराची एकट्या जुलै महिन्यात मेयो व मेडिकलमध्ये २० बालक आढळून आली असून यातील १५ बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व बालक नागपूर ग्रामीणसह विदर्भ व दोन मध्य प्रदेशातील आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या तपासणीत हा ‘चंडिपुरा’ किंवा ‘जपानी मेंदूज्वर’ नसल्याचे समोर आले आहे. नवा ‘व्हायरस’ असल्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहे.
जपानी इन्सेफेलायटिसमुळे (मेंदूला आलेली सूज) आलेल्या बालकांच्या मृत्यूला घेऊन उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील बाबा राघवदास (बीआरडी) मेडिकल कॉलेज चर्चेत आले आहे. हा परिसर अनेक दशकांपासून ‘इन्सेफेलायटिस’च्या प्रसारासाठी कुप्रसिद्ध आहे. या आजाराशी मिळता जुळता परंतु जपानी मेंदूज्वर नसलेले रुग्ण नागपूर ग्रामीणसह विदर्भात आढळून येऊ लागले आहे. जुलै महिन्यात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बालरोग विभागात १८ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दोन रुग्णांची नोंद झाली अहे. यातील एकाचा मृत्यू तर एकावर ‘एनआयसीयू’मध्ये उपचार सुरू आहे. एकाच महिन्यात १५ बालकांच्या मृत्यूने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे, हा जपानी मेंदूज्वर किंवा चंडिपुरा नसल्याचे आतापर्यंतच्या तपासणीतून समोर आले आहे. तज्ज्ञानी हा नवा व्हायरस असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. अधिक तपासणीसाठी संबंधित रुग्णाचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहे.

काय आहे इन्सेफेलायटिस
विषाणू, जीवाणू किंवा बुरशीमुळे मेंदूवर येणारी सूज म्हणजे इन्सेफेलायटिस. हा रोग कुठल्याही वयात होऊ शकतो. परंतु लहान मुलांमध्ये सर्वात जास्त आढळतो. मेंदूवर आलेली सूज आणि त्यामुळे कवटीवर वाढलेला दाब हे या रोगाचे कारण ठरते.

विदर्भातील रुग्णांची संख्या सर्वाधिक
आतापर्यंत आढळून आलेले मेंदूज्वराच्या रुग्णांमध्ये विदर्भातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यात मध्य प्रदेशातील दोन, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया मिळून १६ रुग्ण आहेत. या रोगाचे निदान योग्य पद्धतीने न झाल्यास विशेषत: लहान मुले दगावण्याचा धोका वाढतो. यामुळे मेडिकलच्या बालरोग विभागाने आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अशी लक्षणे आढळून येणाऱ्या बालकांवर करावयाच्या उपचाराची माहिती दिली आहे.

जपानी मेंदूज्वर किंवा चंडिपुरा नसल्याचे निदान
मेडिकलच्या बालरोग विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळून आलेल्या मेंदूज्वराचा रुग्णाची चाचणी केली असता हा मेंदूज्वर जपानी किंवा चंडिपुरा नसल्याचे समोर आले आहे. हा नवीन व्हायरस असण्याची शक्यता आहे. अधिक तपासणीसाठी नमुने पुण्याचा ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

‘इन्सेफेलायटिस’ची मुख्य लक्षणे
ताप, डोकेदुखी, उलट्या, शुद्ध हरविणे, चक्कर येणे, झटके येणे आणि बेशुद्ध होणे आदी ‘इन्सेफेलायटिस’ची मुख्य लक्षणे आहेत. मेडिकलच्या बालरोग विभागानुसार ज्या बालकांमध्ये ही लक्षणे आढळून आलीत त्यातील अनेक बालके २४ तासांच्या आत उपचारादरम्यान दगावली. दुर्दैवाने या रोगावर विशेष उपचार किंवा अँटीबायोटिक्स नाही.

Web Title: Shocking! 15 cases of brain fever in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य