धक्कादायक ! नागपुरात वर्षभरात २३२ नागरिकांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:33 PM2018-01-30T19:33:16+5:302018-01-30T19:37:53+5:30
उपराजधानीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. २०१७ मध्ये शहरात १३०० हूून अधिक अपघात झाले व त्यात २३२ नागरिकांचा मृत्यू झाला. या कालावधीत सर्वात जास्त अपघात दुचाकी वाहनांचे झाले तर ट्रकमुळे चक्क ५९ जणांना आपला जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारांतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. २०१७ मध्ये शहरात १३०० हूून अधिक अपघात झाले व त्यात २३२ नागरिकांचा मृत्यू झाला. या कालावधीत सर्वात जास्त अपघात दुचाकी वाहनांचे झाले तर ट्रकमुळे चक्क ५९ जणांना आपला जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारांतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे शहरातील वाहतूक व्यवस्थेशी संबंधित निरनिराळ्या बाबींबद्दल विचारणा केली होती. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ कालावधीत शहरात किती अपघात झाले, यातील मृत-जखमींचा आकडा, सिग्नल तोडणे तसेच ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची प्रकरणे इत्यादी प्रश्नांचा समावेश होता. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत १ हजार ३७३ अपघात झाले व २३२ नागरिकांना जीव गमावावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे २०१६ सालीदेखील अपघातांचा आकडा हा १ हजार ३७३ इतकाच होता. त्यामुळे हा एक अनोखा योगायोगच आहे. दरम्यान, २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये बळींची संख्या घटल्याचे दिसून आले. शहरात रिंगरोड वर्षभरात ९१ अपघातांची नोंद झाली व यात ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला.
हेल्मेट न घालणाऱ्यांकडून दोन कोटींचा दंड वसूल
शहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियमांप्रती गंभीरता नसल्याची बाबदेखील समोर आली आहे. २०१७ मध्ये शहरात सिग्नल तोडल्यासंदर्भात १९ हजार ९५५ नागरिकांवर कारवाई झाली. यात संबंधितांकडून ३६ लाख ७७ हजार ७९० रुपयांचे शुल्क वसूल करण्यात आले. तर हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या ५५ हजार ९२१ जणांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २ कोटी ७ लाख २८ हजार ३२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मोबाईलवर बोलणे ७ हजार ४९२ जणांना महागात पडले व त्यांच्याकडून १२ लाख ९९ हजार ९९६ रुपयांचा दंड गोळा करण्यात आला.