धक्कादायक.. वर्षभरात २५ वर विद्यार्थी नैराश्यात गेल्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 07:00 AM2022-04-06T07:00:00+5:302022-04-06T07:00:10+5:30
Nagpur News नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील ‘आत्महत्या प्रतिबंधक क्लिनीक’मध्ये या वर्षभरात नैराश्यात गेलेल्या २५ विद्यार्थ्यांची नोंद झाली. यात मुलींचे प्रमाण अधिक आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : एखाद्या गोष्टीचा भ्रम, अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती, शारीरिक बदल, प्रेमभंग आदी कारणांमुळे ऐन वयात आलेल्या एकूण मुलींपैकी २५ ते ३० टक्के मुली नैराश्याने ग्रस्त असतात. प्रादेशिक मनोरुग्णालयातील ‘आत्महत्या प्रतिबंधक क्लिनीक’मध्ये या वर्षभरात नैराश्यात गेलेल्या २५ विद्यार्थ्यांची नोंद झाली. यात मुलींचे प्रमाण अधिक आहे.
मृत्यूनंतरच्या जगाचे कुतूहल वाटू लागल्याने सोमवारी एका १३ वर्षीय मुलीने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली. आर्या हरिश्चंद्र मानकर त्या मुलीचे नाव. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. यात पालकांनी मुलांमुलीमधील बदल वेळीच समजून घेणे त्यांच्याशी संवाद साधणे व गरज वाटल्यास तज्ज्ञ व्यक्तीकडून समुपदेशन करणे आवश्यक आहे. पालकांनी लक्षणे ओळखून वेळीच २५ विद्यार्थ्यांना प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी आणल्याने पुढील धोका टळल्याचे रुग्णालयातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
-१३ ते १५ वयोगटातच होते मानसिक आजाराची सुरुवात
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) मानसिक रोग विभागाचे प्रमुख प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, १३ ते १५ या वयोगटात मानसिक आजाराची सुरुवात होते. यात ‘ओसीडी’ हा प्रामुख्याने दिसून येणारा आजार आहे. यात एकाच गोष्टीमध्ये मुले गुंतून राहतात. काही मुलांमध्ये ही प्रक्रिया सामान्य असते तर काही मुलांमध्यी ही प्रक्रिया गंभीर होते. अनेकांना त्याच्या शिवाय दुसरे काहीच सुचत नाही. ‘आर्या’ला जे कुतूहल निर्माण झाले होते, ते आजाराच्या दृष्टिकोनाने पहायला हवे होते. परंतु तिने ही गोष्ट खूप लपवून ठेवली असेल आणि पालकांनाही ते कळले नसेल. जर तिला वेळीच ओळखले असते, योग्य समुपदेशन झाले असते आणि गरज पडल्यास उपचार मिळाले असते तर ‘कुतूहल’ावर नियंत्रण आणता आले असते.
१८ ते २० वयोगटात लक्षणे होतात तीव्र
कमी वय आहे म्हणून त्यांना कोणते ‘टेन्शन’, असे पालकांनी समजू नये, असा सल्ला देत डॉ. सोमानी म्हणाले, लहानपणापासून सुरू झालेल्या उदा. नैराश्य, ‘स्किझोफ्रेनिया’ किंवा ‘ओसीडी’ आजाराची लक्षणे साधारणपणे १८ ते २० वयोगटात येईपर्यंत तीव्र होतात. त्यानंतर पालक त्यांना डॉक्टरांकडे घेऊन येतात. जेव्हा आम्ही पालकांना विचारतो तेव्हा ते मागील तीन-चार वर्षापासून मुलगा-मुलगी वेगळे वागत असल्याचे सांगतात. यामुळे मुलांच्या वागणुकीत बदल झाल्याचे दिसून येताच तज्ज्ञाशी संपर्क साधायला हवे. त्याकडे दुर्लक्ष करू नये.
-मुलांसोबत मैत्री करा
अनेक पालक मुलांना मी जसे म्हणतो तसेच कर, असा हट्ट धरतात. परंतु पालकांनी हा प्रकार हळूहळू टाळायला हवा. एखादी महत्त्वाची बाब असेल तर ठिक आहे. परंतु सामान्य स्थितीमध्ये पालकांनी मुलांचा पक्ष समजून घ्यायला हवे आणि त्यानुसार त्याला सल्लाही द्यायला हवे. मुलांना मानसिक आजारापासून दूर ठेवण्यााठी मुलांसोबत हळूहळू मैत्री करा, त्यांना समजून घ्या.
-डॉ. अभिषेक सोमानी, प्रमुख मानसिक रोग विभाग, मेयो