धक्कादायक! नागपुरातील मनपाच्या शाळांमध्ये ३३ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:15 AM2018-09-19T10:15:55+5:302018-09-19T10:16:51+5:30
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या पथकाने महानगरपालिकेच्या २४ शाळांमधील २१०५ विद्यार्थ्यांची मुख तपासणी केली असता ७०२ विद्यार्थ्यांना म्हणजे, ३३.३४ टक्के विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आढळून आले आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या पथकाने महानगरपालिकेच्या २४ शाळांमधील २१०५ विद्यार्थ्यांची मुख तपासणी केली असता ७०२ विद्यार्थ्यांना म्हणजे, ३३.३४ टक्के विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आढळून आले आहे. आणखी १० वर्षे हे व्यसन राहिल्यास मुख कर्करोगाच्या विळख्यात विद्यार्थी सापडण्याची भीती आहे. धक्कादायक म्हणजे, याच विद्यार्थ्यांमधून १८ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग असल्याची बाबही उघडकीस आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय निरोगी महाराष्ट्र अभियानाच्यावतीने व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या पुढाकाराने ‘स्वच्छ मुख अभियान’ राबविले जात आहे. या अभियानांतर्गत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, बालरोग दंतशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रितेश कळसकर व १० डॉक्टरांची चमूने आतापर्यंत २४ शाळांमधील विद्यार्थ्यांची मुख तपासणी केली. यात सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ, मोठ्यांच्या व्यसनाकडे आकर्षित झालेले अबोध मन, जाहिरातींचा प्रभाव आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे पाचवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत चालल्याचे आढळून आले.
दर आठवड्यात एका शाळेची तपासणी
मुखाचा कर्करोग हा गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरड्या, जिभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. क्वचितच अपवाद वगळता मुखाचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हेच आहे. याच उद्देशाने ‘स्वच्छ मुख अभियान’अंतर्गत दर आठवड्यातून एका मनपा शाळेची तपासणी केली जात आहे. यात दातांना लागलेली कीड, हिरड्यांचे आजार, दातांना लागलेला मार, मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे, मौखिक सवयी आदींची तपासणी व माहिती संकलन केली जात आहे.
२१०५ विद्यार्थ्यांची तपासणी
दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या पथकाकडून आतापर्यंत २१०५ विद्यार्थ्यांची मुख तपासणी करण्यात आली. यात दातांना कीड लागलेले ८०३ (३८.१४ टक्के) विद्यार्थी, हिरड्यांचे आजार असलेले ६६९ (३१.७८ टक्के) विद्यार्थी, दातांना मार लागलेले ११५ (५.४६ टक्के), मौखिक सवयीचे ८० (३.८४ टक्के), तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे ७०२ (३३.३४ टक्के), मुखपूर्व कर्करोग १८ (०.८५ टक्के तर ‘फ्लोरोसीस’चे ५८ (२.७५ टक्के) विद्यार्थी आढळून आले आहेत.
विद्यार्थ्यांची लपवालपवी
डॉक्टरांनी मुखाची तपासणी केल्यावर संशयित आढळून आलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या कलेने घेत सुपारी, खर्रा, गुटखा, तंबाखू खातो का, असा प्रश्न विचारल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी हे व्यसन लपविण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी दुसऱ्याचे नाव सांगितले, तर काही विद्यार्थ्यांनी कसलेही आढेवेढे न घेता हो व्यसन करतो, असे उघडपणे सांगितले.