धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या शहरात दरदिवसाला ५ जण करताहेत आत्महात्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 08:05 PM2017-10-31T20:05:24+5:302017-10-31T20:05:37+5:30
गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुरुवातीच्या ९ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
नागपूर : गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुरुवातीच्या ९ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. २०१७ मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात ६४ खून झाले आहेत. तर या कालावधीत दीड हजारांहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत. दरदिवसाला सरासरी ५ जणांनी जीव दिला असल्याचे आकडेवारी सांगत आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१७ सालात शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत शहर पोलीसांच्या गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात किती गुन्ह्यांची नोंद झाली, त्यात हत्येचे किती गुन्हे होते, आत्महत्यांचे प्रमाण, बलात्कार इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१७ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहरात विविध प्रकारचे ७ हजार २३७ गुन्हे नोंदविण्यात आले. यात ४ हजार २३७ आरोपींना अटक करण्यात आली. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत ६ हजार ३७९ गुन्हे नोंदविण्यात आले होते.
यंदा खूनांचे ६४ गुन्हे दाखल झाले. ७ महिला, ४८ पुरुष तर ९ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले.
दरोड्यांचे प्रमाण घटले -
दरम्यान, शहरात दरोड्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत शहरात १७ दरोड्यांची नोंद झाली होती. यंदा हा आकडा ८ वर आला असून यात २७ आरोपींना अटक झाली आहे. सोबतच ‘चेनस्नॅचिंग’चे प्रमाणदेखील कमी झाले आहे. मागील वर्षी आॅगस्टपर्यंत १३४ प्रकरणांची नोंद झाली होती. यंदा सप्टेंबरअखेरीस हा आकडा ७२ इतका होता.
दर दिवसाला सरासरी ५ आत्महत्या -
आत्महत्यांची आकडेवारी धक्का लावणारी आहे. ९ महिन्यांमध्ये शहरात १ हजार ५०६ आत्महत्या झाल्या. जर आत्महत्यांची सरासरी काढली तर दर दिवसाला सुमारे ५ आत्महत्यांची नोंद झाली आहे.
बलात्कार कमी कधी होणार ? -
महिला सुरक्षेचे पोलीस प्रशासनातर्फे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात बलात्कारांच्या घटनांमध्ये फारशी घट झालेली नाही. ९ महिन्यांच्या कालावधीत शहरात बलात्काराचे १२२ गुन्हे दाखल झाले. यात १२७ आरोपींना अटक करण्यात आली.