धक्कादायक : राज्यात ६९ टक्के शाळेत मुख्याध्यापक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:22 AM2018-12-01T00:22:37+5:302018-12-01T00:24:24+5:30
डिजिटल शाळेच्या रुपाने शिक्षणाला नव्या विचारांची जोड मिळत असताना, खडू-फळ्याचा पर्याय म्हणून ग्रीन बोर्ड, ग्राफ बोर्ड, व्हाईट बोर्ड आले असताना शिकविणार कोण असा यक्ष प्रश्न आहे. कारण राज्यातील शाळेच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता, ६९ टक्के शाळांमध्ये म्हणजेच ६६९८८ शाळेत मुख्याध्यापकच नाहीत. त्यामुळे उद्याचे भविष्य कसे घडणार अशी चिंता शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना भेडसावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिजिटल शाळेच्या रुपाने शिक्षणाला नव्या विचारांची जोड मिळत असताना, खडू-फळ्याचा पर्याय म्हणून ग्रीन बोर्ड, ग्राफ बोर्ड, व्हाईट बोर्ड आले असताना शिकविणार कोण असा यक्ष प्रश्न आहे. कारण राज्यातील शाळेच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता, ६९ टक्के शाळांमध्ये म्हणजेच ६६९८८ शाळेत मुख्याध्यापकच नाहीत. त्यामुळे उद्याचे भविष्य कसे घडणार अशी चिंता शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना भेडसावत आहे.
चाईल्ड राईट अलायन्स आणि अपेक्षा होमिओ सोसायटी यांनी पत्रपरिषदेत दिलेल्या अहवालानुसार राज्यात १ ते ८ वर्गाच्या ९७०८४ शाळा आहेत. या शाळांमध्ये ६ लाख ५६ हजार ६७३ शिक्षक आहेत. तरीही राज्यातील ४६ हजार शाळांमध्ये विषयानुसार शिक्षक नाहीत. शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही शाळा एक शिक्षकी असू नये, असा नियम आहे. मात्र राज्यात ३५३४ शाळा एकशिक्षकी आहे. ४२४०७ शाळा दोन शिक्षकी आहे. ६९ टक्के शाळांमध्ये म्हणजेच ६६९८८ शाळेत मुख्याध्यापकच नाहीत. महाराष्ट्रात कमी पटसंख्येच्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१७ मध्ये घेतला होता. याला संघटनांनी विरोध केल्याने निम्म्या शाळा वाचल्या. तरीही ५६८ शाळा स्थलांतराच्या नावावर बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती चाईल्ड राईट अलायन्स संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश गोगुलवार व अपेक्षा होमिओ सोसायटीचे संचालक डॉ. मधुकर गुंबळे यांनी पत्रपरिषदेत दिली.