धक्कादायक! घरातच पडून राहिला पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 09:45 AM2020-09-08T09:45:27+5:302020-09-08T09:45:48+5:30
सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दुपारी १२.३० नंतर मनपाच्या शववाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. दरम्यान, कुटुंबीयांनीच मृतदेहाला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घरातील एका कोपऱ्यात ठेवून, इतर सर्वजण घराबाहेर मृतदेह नेणाऱ्या शववाहिकेची वाट बघत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयांकडून दाखविण्यात येत असलेल्या असंवदेनशीलतेमुळे एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने घरातच प्राण सोडले. सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दुपारी १२.३० नंतर मनपाच्या शववाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. दरम्यान, कुटुंबीयांनीच मृतदेहाला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घरातील एका कोपऱ्यात ठेवून, इतर सर्वजण घराबाहेर मृतदेह नेणाऱ्या शववाहिकेची वाट बघत होते.
ही घटना दक्षिण नागपुरातील मित्रनगर येथील आहे. येथे राहणाऱ्या कृपाबाई सुरेंद्रसिंग राठोड यांची रविवारी सकाळी १० वाजता प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना सक्करदरा येथील एका रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांनी भरती करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर बेसा रोड व ओंकारनगर चौक येथील एका खासगी रुग्णालयात नेले असता, त्यांनीही भरती करून घेण्यास नकार दिला. दरम्यान, रु ग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी होत होती. हॉस्पिटल रुग्णाला भरती करून घेत नसल्यामुळे नातेवाईकांनी ९५०० हजार रुपयांचे ऑक्सिजन सिलिंडर आणले. परंतु त्याचाही काहीच परिणाम होत नसल्याने दुपारी ३ वाजता १०८ क्रमांकावर संपर्क करून अॅम्ब्युलन्स मागितली.
ती अॅम्ब्युलन्स रात्री ८ वाजता आली. त्यात एक डॉक्टर होती. तिने वरवर बघून सांगितले की, मेयो आणि मेडिकलमध्ये भरती करण्यास जागाच नाही. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक रात्री १० वाजता लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये विचारण्यास गेले. त्यांनी कोरोनाचा रिपोर्ट मागितला. अखेर एका पॅथॉलॉजीशी संपर्क करून १५०० रुपयांमध्ये रिपोर्ट मिळविला. हा रिपोर्ट आणि रुग्ण घेऊन नातेवाईक लता मंगेशकर हॉस्पिटलला पोहचले. परंतु व्हेंटिलेटर नसल्याचे कारण सांगून त्यांनीही रुग्णाला भरती करून घेण्यास नकार देत परत पाठविले. अखेर रात्री २ वाजता रुग्णाला घरी आणण्यात आले. साडेतीन वाजताच्या सुमारास रुग्णाने जीव सोडला.
रुग्णाला घरी सोडून देण्यास अॅम्ब्युलन्सवाला अडला
रुग्णाच्या अडचणीचा फायदा घेत रात्री १ वाजता अॅम्ब्युलन्सवाल्यानेही अडवणूक केली. अॅम्ब्युलन्स चालक म्हणाला की माझे काम रुग्णालयापर्यंत घेऊन जायचे आहे. घरी सोडायचे नाही. तो रुग्णाला अॅम्ब्युलन्समधून उतरविणार तेवढ्यातच एका खासगी अॅम्ब्युलन्सने ३००० रुपयात सोडून देतो, असे सांगितले. पैसे देत असल्याचे पाहून त्या अॅम्ब्युलन्स चालकाने १५०० रुपये घेऊन सोडून दिले.
एकाही रुग्णालयात जागा नव्हती
रुग्णाला घरी घेऊन आल्यानंतर नातेवाईकांनी रात्री २ वाजेपर्यंत शहरातील सर्वच खाजगी रुग्णालयात संपर्क करून व्हेंटिलेटर असल्याबद्दल विचारणा केली. मात्र सर्वांकडूनच नकार आला.