धक्कादायक ! प्रवाशांचा जीव वाचविणारा बसचालक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 09:19 PM2023-04-17T21:19:40+5:302023-04-17T21:20:07+5:30
Nagpur News १६ प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या बसचालकाला एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी निलंबित केले. दोषींना बाजूला ठेवून निर्दोष बसचालकाला शिक्षा करण्याच्या या प्रकारामुळे एसटीच्या चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांमध्येही तीव्र रोष निर्माण झाला आहे.
नागपूर : १६ प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या बसचालकाला एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी निलंबित केले. दोषींना बाजूला ठेवून निर्दोष बसचालकाला शिक्षा करण्याच्या या प्रकारामुळे एसटीच्या चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांमध्येही तीव्र रोष निर्माण झाला आहे.
अमरावती मार्गावर प्रवासी घेऊन धावत असलेल्या एमएच ०६ / बीडब्लयू ०७८८ क्रमांकाच्या शिवशाही बसला भीषण आग लागली होती. ४ एप्रिलला सकाळी ९ वाजता कोंढाळीजवळ ही घटना घडली होती. बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत लगेच बसला रस्त्याच्या कडेला घेऊन वाहकाच्या मदतीने प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यास मदत केली होती. यावेळी बसमध्ये १६ प्रवासी होते. बसची आग एवढी भीषण होती की संपूर्ण बसच निकामी होऊन २० लाखांचे नुकसान झाले होते. मात्र, बसचालक अब्दुल जहीर शेख आणि वाहक उज्ज्वला संजय देशपांडे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांचे जीव वाचले होते. बसला लागलेल्या या भीषण आगीचे कारण शोधण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमण्यात आली. या चाैकशी समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे बसचालक जहीर यांना दोन दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले.
बसचालकाने थोडाही हलगर्जीपणा दाखवला असता तर अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतले असते. चालकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळेच प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या या तत्परतेची दखल घेऊन त्यांचे काैतुक करण्याऐवजी एसटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाचा आसूड ओढला.
यामुळे लागली आग
विशेष म्हणजे, बसची वायरिंग गरम येऊन इंजिन पेटल्याचे अर्थात बसला आग लागल्याचे चाैकशीत पुढे आल्याची माहिती आहे. अर्थात् नुसती वायरिंगच नव्हे तर संपूर्ण बसच्या देखभालीची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्यांची असताना त्यांना सोडून बसचालकाला निलंबित केल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
... म्हणून झाली कारवाई
आग अथवा कोणत्याही आणीबाणीच्या वेळी काय करायला पाहिजे, त्याचे प्रशिक्षण बसचालकाला देण्यात येते. आग लागल्यानंतर लगेच अग्निशमन उपकरणाचा वापर करायला हवा. तो झाला नसल्याने बसचालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती या संबंधाने बोलताना एसटीचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी दिली.
-----