Vidhan Sabha Election 2019; राज्यात भाजपमध्ये धक्कादायक बदल; मेरिटनुसार शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 10:35 AM2019-09-30T10:35:45+5:302019-09-30T10:36:33+5:30
भाजपची केंद्रीय संसदीय समितीची दिल्लीतील बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात रविवारी रात्री उशिरा महाराष्ट्रातील सर्व जागांवर विस्तृत चर्चा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपची केंद्रीय संसदीय समितीची दिल्लीतील बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात रविवारी रात्री उशिरा महाराष्ट्रातील सर्व जागांवर विस्तृत चर्चा झाली. या चर्चेत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, काही धक्कादायक बदलही होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस व गडकरी या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. यावेळी त्यांनी विदर्भासह नागपूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक जागेवर मंथन केले. इच्छुक उमेदवारांसह विद्यमान आमदार यांनी पक्षासाठी केलेले काम, सद्यस्थितीत मतदारसंघात असलेली त्यांची पकड व पक्षाने केलेले सर्वेक्षण, या आधारावर त्यांनी उमेदवारांचे मेरिट निश्चित करीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भासह नागपुरातही काही धक्कादायक बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागपुरात रात्री उशिरापर्यंत इच्छुक नेत्यांचे कार्यकर्ते दिल्ली, मुंबईत फोन करून खातरजमा करून घेत होते. काहींनी सोशल मिडियावर उमेदवारांची यादीही जाहीर केली. विशेष म्हणजे प्रत्येक यादीत वेगवेगळी नावे होती.