धक्कादायक! नागपूरच्या सांडपाण्यात चिकुनगुनिया, रेबीजचे विषाणू
By सुमेध वाघमार | Published: May 20, 2023 08:45 AM2023-05-20T08:45:00+5:302023-05-20T08:45:02+5:30
Nagpur News नागपूरच्या सांडपाण्यात चिकुनगुनिया व रेबीजच्या ‘झुनोटिक व्हायरस’ आढळून आला आहे. सांडपाण्यावरील हा महत्त्वपूर्ण अभ्यास ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या (सीम्स) संशोधकांनी केला आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : नागपूरच्या सांडपाण्यात चिकुनगुनिया व रेबीजच्या ‘झुनोटिक व्हायरस’ आढळून आला आहे. सांडपाण्यावरील हा महत्त्वपूर्ण अभ्यास ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या (सीम्स) संशोधकांनी केला आहे. सांडपाण्यातही या रोगाचे विषाणू आढळून येणे हे धक्कादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ-साउथईस्ट एशिया’ या अग्रगण्य क्लिनिकल जर्नलमध्ये या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित झाले. तज्ज्ञांच्या मते, हा अभ्यास केवळ या विषाणूंमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यासोबतच इतरही संसर्गजन्य रोगांचा लवकर शोध घेण्याकरिता आणि त्यावर पाळत ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. या अभ्यासाचे नेतृत्व डॉ. राजपाल सिंग कश्यप आणि डॉ. तान्या मोनाघन यांनी केले. डॉ. सिंग म्हणाले, या अभ्यासातून भविष्यातील विषाणूजन्य साथीच्या आजाराचे धोक शोधणे आणि त्याच्या निराकरणासाठी सांडपाण्याचे निरीक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.
-कोविडचा विषाणूही सांडपाण्यात
डॉ. सिंग म्हणाले, कोविडसाठी जबाबदार असलेला ‘सार्स-सीओव्ही-२’ हा विषाणू सांडपाण्याचा ५९ टक्के नमुन्यात आढळून आला. यामुळे त्याचा पुढील अभ्यास करणे गरजेचे आहे.
-‘हिपॅटायटिस-सी’सोबत कोरोनाचा विषाणू
सांडपाण्याच्या निरीक्षणात कोरोनाला कारणीभूत असलेला ‘सार्स-सीओव्ही-२’ हा विषाणू ‘हिपॅटायटिस-सी’ विषाणूसोबत आढळून आला. या दोन विषाणूमधील संभाव्य कनेक्शनचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. आश्चर्य म्हणजे, हे दोन्ही विषाणू शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक आढळून आले. दुसरीकडे, चिकुनगुनिया आणि रेबीजसारखे झुनोटिक व्हायरसही ग्रामीण भागात अधिक प्रमाणात दिसून आले.
-सांडपाण्यात विषाणूंची विविधता
सांडपाण्याचा संशोधनात ‘इन्फ्लूएन्झा-ए’, ‘नोरो व्हायरस’ आणि ‘रोटा व्हायरस’ या विषाणूंच्या जीनोमिक तुकड्यांचे विभाजनही दिसून आले. ज्यामुळे सांडपाण्यात असलेल्या विषाणूंची गुंतागुंत आणि विविधता दिसून येत असल्याचे डॉ. कश्यप यांचे म्हणणे आहे.
-विषाणूंच्या निरीक्षणासाठी सांडपाण्याचे विश्लेषण महत्त्वाचे
भविष्यातील रोगांचे धोके व त्याचा सामना करण्यासाठी सांडपाण्यातील विषाणूचे निरीक्षण महत्त्वाचे ठरणार असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. याचा अधिक अभ्यास होणेही गरजेचे आहे.
-डॉ. राजपाल सिंग कश्यप