धक्कादायक : मृत बहीण-भावाच्या खात्यात जमा होते ३६ लाख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:00 PM2019-01-16T23:00:35+5:302019-01-16T23:07:43+5:30
संशयास्पद अवस्थेत श्वानासह घरात मृतावस्थेत सापडलेले भाऊबहिण आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. भाऊ मोहनलाल ओटवानीच्या पोस्ट खात्यात ३५ लाख रुपये जमा होते तर बहीण शांता ओटवानी यांच्या एसबीआयच्या खात्यात १ लाख ३० हजार रुपये जमा होते. बचत खात्यात लाखो रुपये जमा असूनही ते दयनीय अवस्थेत राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान ३० तास उलटल्यानंतरही दोघांच्या कुठल्याही नातेवाईकाचा पत्ता लागलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संशयास्पद अवस्थेत श्वानासह घरात मृतावस्थेत सापडलेले भाऊबहिण आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. भाऊ मोहनलाल ओटवानीच्या पोस्ट खात्यात ३५ लाख रुपये जमा होते तर बहीण शांता ओटवानी यांच्या एसबीआयच्या खात्यात १ लाख ३० हजार रुपये जमा होते. बचत खात्यात लाखो रुपये जमा असूनही ते दयनीय अवस्थेत राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान ३० तास उलटल्यानंतरही दोघांच्या कुठल्याही नातेवाईकाचा पत्ता लागलेला नाही.
८० वर्षीय मोहनलाल आणि त्यांची ७५ वर्षीय बहीण शांता १५ जानेवारी रोजी दुपारी आपल्या घरात पाळीव श्वानासह मृतावस्थेत आढळून आले. तिघांच्याही मृत्यूचे कुठलेही कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मोहनलाल आणि त्याच्या बहिणीची परिसरातील कुणाशीही बोलचाल नव्हती. त्यांच्या घरी कुणी येत-जातही नव्हते. दोघेही पाळीव श्वानासह एकाकी जीवन जगत होते. त्यांचे घर तात्या टोपेनगरातील मुख्य रस्त्यावर आहे. त्याची किंमतच कोट्यवधी रुपये आहे. त्यांचे घरही बाहेरून जीर्ण झालेले वाटत होते. घराला प्लास्टरही झाले नाही. घर आणि स्वयंपाक खोलीतील अवस्था पाहता घरात अनेक दिवसांपासून जेवणच बनले नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तिघांचाही मृत्यू भुकेने झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
बजाजनगर पोलीस घटनेपासूनच त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. त्यांच्या घरातून तीन मोबाईल सापडले. दोन मोबाईल कुठल्याही कामाचे नाहीत. एका मोबाईलच्या कॉल लिस्टमध्ये १० नंबर सापडले आहे. पोलिसांनी सर्वच नंबरवर संपर्क केला. ते नंबर सिलिंडर देणारे, दूध देणारे, मीटर रिंडींग कर्मचारी आणि इतर वस्तू आणून देणाऱ्यांचे आहेत. त्या सर्वांनीच त्यांच्या कुठल्याही नातेवाईकांची माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी खामला आणि जरीपटका परिसरातील काही कुटुंबांशीही संपर्क केला. पोलिसांना घरातून डाक विभागाचे बुक आणि एसबीआयचे पासबुक सापडले. यात मोहनलालने पोस्ट खात्यात ३५ लाख रुपयाची एफडी केल्याचे आढळून आले तर एसबीआयच्या खात्यात १ लाख ३० हजार रुपये आहेत. दोघांनीही आपापल्या खात्यात एकमेकांना वारसदार म्हणून सांगितले आहे.
३६ लाखापेक्षा अधिक रक्कम खात्यात असुनही दोघेही दयनीय जीवन जगत असल्याने पोलीसही आश्चर्य व्यक्त करीत आहे. आतापर्यंतच्या तपासात मोहनललाचा मृत्यू आधी झाल्याचा संशय आहे. मोहनलालच्या मृत्युने शांताही बेशुद्ध झाल्याचा संशय आहे. तिने घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला असावा. कारण तिचा मृतदेह दरवाजाजवळ सापडला. मोहनलालचे पाय आणि हातावर ओरबाडल्याचा खुना आहेत. श्वानाने ओरबाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरात कुठलही संशयास्पद वस्तू सापडली नाी. त्यामुळे दोघांनीही श्वानासह भुकेने जीव सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
श्वानाचाही केला पोस्टमार्टम
पोलिसांनी भाऊ-बहिणीसह त्यांचा पाळीव श्वानाचेही पोस्टमार्टम करायला लावले. दोघांचे मेडिकलमध्ये तर श्वानाचे वेटरनरी कॉलेजमध्ये पोस्टमार्टम करण्यात आले. श्वानाच्या पोटात अन्नाचा एक कणही आढळून आला नाही. हीच अवस्था भाऊबहिणीची होती. त्यामुळे भुकेने त्यांचा मृत्यू झाल्याच्या शंकेला अधिक बळ मिळते.
भांडेवाडीत पाठवला जिवीत श्वान
पोलिसांना मृत श्वानासह एक जिवंत श्वानही घरात सापडले. पोलिसांनी त्याला जेवण देऊन घराबाहेर करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्याला पकडून भांडेवाडी येथील श्वान केंद्रात पाठवण्यात आले. शांताला श्वान खूप आवडायचे. ती काही दिवसांपूर्वीपर्यंत परिसरातील बेवारस श्वानांना दूध पाजायची. तिला पाहताच श्वान धावत यायचे. हे श्वान कुणालाही तिच्या घरात जाऊ देत नव्हते.