धक्कादायक घटना; 'त्यांनी' पूजा करून रचले सरण अन् धगधगत्या चितेत देह त्यागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 07:44 PM2022-03-01T19:44:14+5:302022-03-01T19:52:39+5:30
Nagpur News वृद्धाने आधी स्वत:चे सरण रचले. त्या सरणाची पूजा केली आणि नंतर त्या सरणावर स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. ही बाब इतरांच्या निदर्शनास येईपर्यंत त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेला हाेता.
नागपूर: वृद्धाने आधी स्वत:चे सरण रचले. त्या सरणाची पूजा केली आणि नंतर त्या सरणावर स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. ही बाब इतरांच्या निदर्शनास येईपर्यंत त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेला हाेता. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील किन्ही येथे मंगळवारी (दि. १) सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
आत्माराम मोतीराम ठवकर (८०, रा. किन्ही, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. आत्माराम यांची गावालगत शेती असून, त्यांच्या शेतात गॅस सिलिंडरचे गाेडाऊन आहे. याच गाेडाऊनच्या बाजूला त्यांनी स्वत:ला सरणावर जाळून घेत आत्महत्या केली. किन्ही येथे शनिवारी (दि. २८) रात्री मंडईचे आयाेजन केले हाेते. त्यामुळे ते मंडईत झाडीपट्टी नाटक बघायला गेले हाेते. पहाटेच्या सुमारास ते मंडईतून शेतात आले. त्यांनी शेतातील लाकडे गाेळा करून सरण रचले व त्यावर तणस टाकली. सरणाजवळ जळता दिवा, पानाचा विडा आढळून आल्याने त्यांनी आधी सरणाची पूजा केल्याचे स्पष्ट हाेते. पूजा करून ते सरणावर चढले व स्वत:ला जाळून घेतले.
हा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेलतूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात पाठविला. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक नितेश डाेर्लीकर करीत आहेत.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आत्माराम हे धार्मिक वृत्तीचे असून, वारकरी संप्रदायाचे अनुयायी हाेती. उतारवयामुळे ते नेहमी आजारी राहायचे. मात्र, त्यांना काेणताही दुर्धर आजार नव्हता किंवा ते गंभीर आजारी पडले नाहीत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. शिवाय, आर्थिक परिस्थती चांगली असून, सर्व व्यवहार मुलगा बघत असल्याने त्यांना आर्थिक अडचणीही नव्हत्या, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी हा टाेकाचा निर्णय का घेतला असावा व सरण रचून स्वत:ला जाळून घेत आत्महत्या करण्याचा मार्ग का निवडला असावा, हे मात्र स्पष्ट झाले नाही.
...