धक्कादायक; नागपुरात मृतदेहांची अदलाबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:08 PM2020-05-29T12:08:55+5:302020-05-29T12:11:09+5:30
‘कोविड’ विषाणूची चाचणी करण्यासाठी आलेल्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी उघडकीस आला. चुकीच्या मृतदेहाची ओळख पटविल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, दफन केलेला मृतदेह बाहेर काढावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपर : ‘कोविड’ विषाणूची चाचणी करण्यासाठी आलेल्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी उघडकीस आला. चुकीच्या मृतदेहाची ओळख पटविल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, दफन केलेला मृतदेह बाहेर काढावा लागला. रात्री उशीरा दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सक्करदरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणारा झुबेदा आश्रम येथील एका वृद्ध महिलेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. अचानक मृत्यू झाल्याने कोविड चाचणी करण्याचा नियम आहे. त्यानुसार मृतदेह मेडिकलमध्ये आणण्यात आला. डॉक्टरांनी मृतदेहाचा नमुना घेऊन चाचणीसाठी पाठविला. तर अहवाल येईपर्यंत मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला. याच दिवशी जयभीमनगर येथील ७० वर्षीय महिलेचा घरीच मृत्यू झाला. कंटन्मेंट भागातील महिला असल्याने नमुना तपासणीसाठी मृतदेह मेडिकलमध्ये आणण्यात आला. या मृतदेहाचेही नमुना घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले, तर मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला. गुरुवारी सकाळी झुबेदा आश्रम येथील वृद्ध महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे मेडिकलच्या शवगृहातून सक्करदर पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. पोलीस आश्रमचा एका कर्मचाऱ्याला घेऊन आले. कर्मचाºयाने मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी पंचनामा करून कर्मचाºयाकडे मृतदेह सोपविला. अनोळखी वृद्धा असल्याने मोक्षधाम घाटावर दफनविधी करण्यात आला. सायंकाळी जयभीमनगर येथील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला. याची माहिती मेडिकलच्या बुथला देण्यात आली. त्यांनी मृतदेहाच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. परंतु शवागृहात जो मृतदेह होता तो आपला नसल्याचे नातेवार्इंकांनी सांगताच गोंधळ उडाला. त्यांनी तातडीने मोक्षधाम गाठले. अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाली होती. पुन्हा दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईकांनी ओळख पटवली. पोलिसांनी पुन्हा पंचनामा करीत मृतदेह सोपविला. सक्करदरा पोलिसांनी पुन्हा मेडिकल गाठून झुबेदा आश्रममधील वृद्ध महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. आश्रमच्या कर्मचाऱ्याकडे तो सापविला. रात्री उशीरा दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपुरच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे.
-चुकीच्या मृतदेहाची ओळख पटवली चुकीचा मृतदेहाची ओळख पटविल्याने हा गोंधळ उडाला. यात मेडिकलकडून कुठलिही चूक झालेली ही. मेडकलने दोन्ही मृतदेहाचे नमुना घेऊन ते तपासून तसा अहवाल दिला.
डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल