धक्कादायक! पहिला डोस कोविशिल्डचा, दुसरा कोव्हॅक्सिनचा : मेडिकलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 12:15 AM2021-07-01T00:15:44+5:302021-07-01T00:16:15+5:30

Corona Vaccination default एका ज्येष्ठ महिलेला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ‘कोविशिल्ड’चा दिला असताना दुसरा डोस ‘कोव्हॅक्सिन’चा देण्यात आल्याचा प्रकार बुधवारी मेडिकलमध्ये उजेडात आल्याने खळबळ उडाली.

Shocking! The first dose is Covishield, the second is Covacin | धक्कादायक! पहिला डोस कोविशिल्डचा, दुसरा कोव्हॅक्सिनचा : मेडिकलमधील प्रकार

धक्कादायक! पहिला डोस कोविशिल्डचा, दुसरा कोव्हॅक्सिनचा : मेडिकलमधील प्रकार

Next
ठळक मुद्देदोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरच्या वापरामुळे झाली चूक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एका ज्येष्ठ महिलेला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ‘कोविशिल्ड’चा दिला असताना दुसरा डोस ‘कोव्हॅक्सिन’चा देण्यात आल्याचा प्रकार बुधवारी मेडिकलमध्ये उजेडात आल्याने खळबळ उडाली. लसीकरण नोंदणीच्या वेळी दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरचा वापर झाल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. नागपुरातील या पहिल्याच घटनेने आरोग्य विभागालाही धक्का बसला आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्त्या ज्येष्ठ महिलेने एप्रिल महिन्यात आर्वीच्या लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लस घेतली. तीन महिन्यांनंतर त्या नागपुरात मुलीकडे आल्या असता त्या मुलीने स्वत:च्या मोबाइलवरून दुसऱ्या डोससाठी नोंदणी केली. नागपुरात कोविशिल्डचा तुटवडा असल्याने बुधवारी या लसीचे सर्वच सेंटर बंद होते. केवळ कोव्हॅक्सिन केंद्रावर लसीकरण सुरू होते. त्यानुसार त्या महिलेची मेडिकलमध्ये नोंदणी झाली. महिला दुपारी ४ वाजताच्या सुमारास केंद्रावर आली. तिने हा दुसरा डोस असल्याचे न सांगताच लस घेतली. परंतु केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीही याबाबत विचारले नसल्याचे तक्रारकर्त्या महिलेचे म्हणणे आहे. नर्सने लस दिल्यानंतर कोव्हॅक्सिनचा हा डोस असल्याचे सांगितल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तक्रारकर्त्या महिलेला लस घेतल्यानंतर दोन वेळा उलट्या झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर तिच्या मुलीने अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांना भेटून तक्रार केली. सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.

मेडिकलच्या लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले, दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून नोंदणी केल्याने हा प्रकार घडला. दुसऱ्या डोससाठी दुसऱ्या मोबाइलवरून नोंदणी करण्यात आल्याने हा पहिला डोस असल्याचे ‘को-विन’ अ‍ॅपवर नमूद झाल्याने कर्मचाऱ्याने याबाबत विचारणा केली नाही. महिलेनेही दुसरा डोस असल्याचे सांगितले नाही. मेडिकलमध्ये सुरुवातीपासून केवळ ‘कोव्हॅक्सिन’च दिले जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेला काही वेळ थांबवून तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. कुठलीही लक्षणे न दिसल्याने काही वेळाने त्यांना घरी जाऊ देण्यात आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Shocking! The first dose is Covishield, the second is Covacin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.