धक्कादायक ! पाच वर्षांत चार लाख झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:54 AM2020-01-13T10:54:19+5:302020-01-13T10:55:33+5:30
वनखात्याच्या नागपूर विभागांतर्गत २०१५ सालापासून थोड्याथोडक्या नव्हे तर चार लाखांहून अधिक झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे झाडे लावण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध मोहिमा राबविण्यात येत असल्या तरी वृक्षांची बेकायदेशीरपणे होणारी कत्तल थांबविण्यात यश आलेले नाही. वनखात्याच्या नागपूर विभागांतर्गत २०१५ सालापासून थोड्याथोडक्या नव्हे तर चार लाखांहून अधिक झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली. याच कालावधीत वनविभागाची परवानगी घेऊन ६४ लाखांहून अधिक झाडे कापण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत वनखात्याच्या नागपूर कार्यालयाकडे विचारणा केली होती. २०१५ पासून परवानगी घेऊन किती झाडे पाडण्यात आली, किती झाडे बेकायदेशीरपणे पाडण्यात आली, त्यात सागवानाच्या झाडांची संख्या किती होती इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. वनविभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ४ लाख ३३५ झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली. या झाडांची किंमत २६ कोटी ४ लाख रुपये इतकी आहे. तर एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ या कालावधीत नागपूर विभागात वनखात्याची परवानगी घेऊन ६४ लाख ४२ हजार ४०१ झाडे तोडण्यात आली. एकूण ६९ हजार ४१२ प्रकरणांत ही परवानगी घेण्यात आली होती.
सागवानच ‘टार्गेट’
वृक्षतोडीमध्ये सर्वात जास्त प्रमाण सागवानाच्या झाडांचेच असल्याची बाब समोर आली आहे. १ जानेवारी २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत बेकायदेशीरपणे सागवानाची १ लाख ७३ हजार ९४१ झाडे तोडण्यात आली. त्यांची किंमत १९ कोटी ३० लाख इतकी होती. एकूण तोडलेल्या झाडांच्या तुलनेत सागवानाच्या झाडांची टक्केवारी ही ४३.४५ टक्के इतकी होती तर १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत परवानगी घेऊन सागवानाची तब्बल ४३ लाख ६६ हजार ७३० झाडे तोडण्यात आली. एकूण झाडांच्या तुलनेत यांची टक्केवारी ही ६७.७८ टक्के इतकी ठरली.