धक्कादायक! जानेवारी महिन्यात देशात १३ तर राज्यात ४ वाघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 07:00 PM2022-01-29T19:00:56+5:302022-01-29T19:02:16+5:30
यावर्षी केवळ जानेवारी महिन्यात देशभरात १३ वाघांचा मृत्यू झाला. या काळात महाराष्ट्रात चार वाघांचा मृत्यू झाला.
निशांत वानखेडे
नागपूर : गेल्या वर्षीपासून सुरू असलेले व्याघ्र मृत्यूचे सत्र थांबताना दिसत नाही. मागील वर्षी दशकातील सर्वाधिक व्याघ्र मृत्यूची नाेंद झाली हाेती. यावर्षीची सुरुवात त्याच दिशेने हाेत आहे. यावर्षी केवळ जानेवारी महिन्यात देशभरात १३ वाघांचा मृत्यू झाला. या काळात महाराष्ट्रात चार वाघांचा मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशातील काॅलरवाली वगळता हे सर्व मृत्यू अनैसर्गिक आहेत. त्यामुळे ‘वाघ वाचवा’ माेहिमेला धक्का लागल्याचे दिसून येत आहे.
जानेवारी महिन्यात विदर्भात झालेल्या चार वाघांचे मृत्यू हे संरक्षित क्षेत्राच्या बाहेर झालेले आहेत. पहिला मृत्यू ३ जानेवारीला उमरेड-कऱ्हांडला रेंजच्या काेदाचलबर्डी, भद्रावती बीटमध्ये झाला. त्यानंतर ५ जानेवारीला गडचिराेली सर्कलच्या वडसा विभागात कटाली गावात एका प्राैढ वाघाचा मृत्यू झाला. १३ जानेवारीला अर्जुनी माेरगाव रेंजच्या रामाघाट बीटमध्ये नर वाघ मृत आढळला आणि आता २८ जानेवारीला भंडारा जिल्ह्यात डाेडमाधरी बीटमध्ये माथाडी गावात एका तरुण वाघाचा मृत्यू झाला. इतर नऊ मृत्यू मध्य प्रदेश, कर्नाटक व बिहार राज्यात नाेंदविण्यात आले.
शिकारीवर बऱ्यापैकी नियंत्रण आले असले तरी ते बंद झाले नाही. याशिवाय विषप्रयाेग आणि विजेच्या शाॅकमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे ‘वाघ वाचवा’ मोहिमाचा फज्जा उडाला का, असा सवाल असून अनैसर्गिक मृत्यूमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तृणभक्षी प्राण्याच्या शिकारीत वाघही बळी
हिवाळ्याच्या दिवसात शेतामध्ये चांगले अन्नपदार्थ मिळते. ते खाण्यासाठी जंगलातील तृणभक्षी प्राणी शेताकडे धाव घेतात. त्यांच्या शिकारीसाठी वाघही शेताकडे वळतात. या प्राण्यांपासून शेताचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून विषप्रयाेग केला जाताे किंवा विद्युत तारेचे कुंपण टाकले जाते. यामध्ये वाघही बळी पडतात. इतर प्राण्यांच्या मृत्यूची तर नाेंदही हाेत नाही. विद्युत प्रवाहामुळे गेल्या १२ महिन्यात सात वाघांचा मृत्यू झाला. त्यातील सर्वाधिक घटना नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या.
दशकात सर्वाधिक मृत्यू २०२१ मध्ये
२०२१ साली देशात तब्बल १२७ वाघांच्या मृत्यूची नाेंद झाली. या वर्षात महाराष्ट्रातही २६ वाघांचा मृत्यू झाला. देश व राज्य पातळीवर हा दशकभरातील सर्वाधिक आकडा आहे. महाराष्ट्रात जानेवारीत ४, फेब्रुवारीत २, मार्चमध्ये ८, एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये प्रत्येकी एक, नाेव्हेंबरमध्ये ३ तर डिसेंबर महिन्यात ३ वाघ मृत्युमुखी पडले.
सर्वांना रेडिओ काॅलर लावा
- वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत डाॅ. जेरिल बानाईत यांच्या मते, वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी सर्व वाघांना रेडिओ काॅलर लावणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे बाहेर येणाऱ्या वाघांचीही माॅनिटरिंग करणे शक्य हाेईल.
- शेतकऱ्यांना नि:शुल्क किंवा अल्पदरात साेलर फेन्सिंगचा पुरवठा करावा.
- व्याघ्र संवर्धनाचे धाेरण ठरविताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे. त्यांच्या समस्या जाणून कारवाई करावी.
- व्याघ्र शिकार प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी फास्ट ट्रॅक काेर्टची स्थापना करावी. अनेक प्रकरणात गुन्हेगारावर चार्जशीट दाखल हाेत नाही. न्यायालयात प्रकरणे बराच काळ प्रलंबित असतात व बहुतेक आराेपींची निर्दाेष सुटका हाेते.