धक्कादायक! विमान उडवण्याआधीच इंडिगोच्या वैमानिकाचा मृत्यू; आठवड्यातील तिसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 10:46 PM2023-08-17T22:46:36+5:302023-08-17T22:46:47+5:30
हृदयविकाराचा धक्का बसल्याचा अंदाज
नागपूर : नागपूरवरून पुण्याला जाणार असलेल्या इंडिगोविमानाच्या पायलटचा भोवळ येऊन पडल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. हृदयविकाराच्या धक्क्याने पायलटचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आठवड्याभरात अशाप्रकारे पायलटचा मृत्यु हाेण्याची ही तिसरी घटना आहे.
कॅप्टन मनोज सुब्रमण्यम (वय ४०) असे मृत्यू झालेल्या पायलटचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडिगोचे विमान नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी तयार हाेती. या विमानाचे पायलट कॅप्टन मनोज सुब्रमण्यम विमानात चढण्यापूर्वी विमानतळाच्या बाेर्डिंग गेटजवळच अचानक भोवळ येऊन खाली कोसळले. विमानतळावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दुपारी १२.३० च्या सुमारास त्यांची तपासणी करून त्यांना त्वरित मेडिकलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु मेडिकलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत डिजीसीएकडून मिळालेल्या माहितीनुसार पायलटने बुधवारी सकाळी ३ ते ७ वाजतापर्यंत नागपूर हाेत तिरुवनंतपूरम ते पुणे अशा दाेन टप्प्यात विमान उडविले हाेते. वैमानिकाला २७ तासापूर्वी आराम देण्यात आला, असा दावा डिजीसीएने केला. गुरुवारी या पायलटला चार टप्प्यात उड्डान भरायची हाेती पण त्यापूर्वीच बाेर्डिंग गेटवर ते भाेवळ येऊन पडले व त्यांचा मृत्यु झाला. कॅप्टन मनोज सुब्रमण्यम यांचे उद्या शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त हाेत असला तरी खरे कारण शवविच्छेदनानंतरच समाेर येईल.
अचानक पायलटचा मृत्यु हाेण्याची ही आठवड्याभरातील तिसरी घटना आहे. यापूर्वी बुधवारी कतार एअरवेजचे वरिष्ठ वैमानिक प्रवासी म्हणून इंडिगाेच्या दिल्ली ते दाेहा विमानात बसले हाेते. अचानक ते विमानातच पडले व त्यांचा मृत्यु झाला. क्युआर ५७९ या विमानाची त्यामुळे दुबईला अकस्मात लॅंडिंग करण्यात आली हाेती. तिसरी घटना १४ ऑगस्टची चिली या देशातील आहे. मियामीवरून चिलीच्या सॅंटियागाेला जात असलेल्या लॅटम एअरलाईन्सच्या वैमानिकाला विमानाच्या बाथरूममध्ये भाेवळ आली व ते अचानक पडले. त्यामुळे विमानाला आपात्कालिन स्थितीत पनामा येथे उतरविण्यात आले. उतरताच दाेन डाॅक्टर व नर्सने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण इवान अंदाउर नामक या ५६ वर्षीय वैमानिकाचे निधन झाले. याशिवाय युनायटेड एअरलाईन्सच्या सारासाेटा ते न्युयार्कला जाणाऱ्या विमानाच्या पायलटला हृदयविकाराचा धक्का बसला व ते विमानातच काेसळले. ७ ऑगस्टच्या अन्य एका घटनेत साप्पाेराे ते ताईपेईला जाणाऱ्या टायगर एअर फ्लाईटच्या विमानातील सहवैमानिकासाठीही अशाप्रकारे आपात्कालिन परिस्थिती निर्माण झाली हाेती.