धक्कादायक! नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्या बनवून इराकमध्ये मिळविल्या नोकऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 09:08 PM2023-06-24T21:08:09+5:302023-06-24T21:08:53+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्या बनवून २७ जणांनी इराकमध्ये नोकरी मिळविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्या बनवून २७ जणांनी इराकमध्ये नोकरी मिळविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. परंतु, या सर्वांवर इराकच्या दूतावासाला शंका आली. यानंतर इराकी दूतावासाने या पदव्यांच्या सत्यापनासाठी विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालयांशीसुद्धा संपर्क केला.
मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इराकच्या दुतावासातर्फे साकोलीच्या बाजीराव करंजेकर महाविद्यालय कॉलेज ऑफ फार्मसी, वर्धा येथील बापूराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेज आणि नागपूर शहरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालय यांच्याकडून इराकमध्ये नोकरी करीत असलेल्या २७ लोकांची माहिती आणि दस्तावेज मागण्यात आले. या संस्थांना विचारण्यात आले की, या सर्वांची पदवी खरी आहे का? यावर संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता असे आढळून आले की, या विद्यार्थ्यांनी या तिन्ही महाविद्यालयांतून शिक्षण घेतलेले नाही. या लोकांच्या केवळ गुणपत्रिकाच नव्हे तर पदवीसुद्धा बोगस होती. मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात विद्यापीठाने केंद्र सरकारच्या शिक्षण विभाग, विदेश मंत्रालय, गृह विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला कळविले आहे. विद्यापीठाने आतापर्यंत पोलिसांत तक्रार केलेली नाही. मात्र, एक-दोन दिवसांत विद्यापीठ पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले जाते. यासोबतच इराकी दूतावासही या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिस तक्रार करणार आहे.
विद्यापीठाचा लोगो व कुलपतींची बनावट स्वाक्षरी
विदेशात नोकरी करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठाच्या लोगोसह कुलपतींच्या बोगस स्वाक्षरीचाही वापर केला. या २७ पदव्यांपैकी २४ फार्मसी, २ इंजिनिअरिंग आणि एक मायक्रोबायोलॉजीच्या पदवीचा समावेश आहे. या सर्व पदव्या २०१७, २०१९ आणि २०२० च्या आहेत. यात सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे कोविड काळात २०१९ आणि २०२० ची पदवीसुद्धा या विद्यार्थ्यांनी तयार केली.
इराकचे अधिकारी पोहोचले विद्यापीठात
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी इराकी दूतावासाचे समन्वयक अब्दुल हामीद यांनी स्वत: विद्यापीठात येऊन या प्रकरणाची माहिती घेतली. इराकी दूतावासाच्या समन्वयकांना जेव्हा या प्रकरणाची सत्यता लक्षात आली, तेव्हा तेसुद्धा आश्चर्यचकित झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी जमा केलेले सर्व दस्तावेज सत्यापनासाठी इराकच्या विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाला पाठविण्यात आले होते. या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या पदवी आणि गुणपत्रिता बोगस असल्याचा संशय आला. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात संबंधित महाविद्यालयाला पत्र पाठविण्यात आले आणि नंतर विद्यापीठाकडून माहिती घेण्यात आली.
ते विद्यार्थी इराकचेच, नागपूर विद्यापीठाचीच पदवी का ?
बोगस पदवी बनवून नोकरी करणारे ते सर्व २६ विद्यार्थी इराकचेच आहेत. इराकी दूतावास त्यांची कसून विचारपूस करीत आहे. विद्यार्थ्यांनुसार ते शिक्षणासाठी भारतात आले होते. या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठाचीच निवड का केली? विदर्भ किंवा देशाच्या इतर भागात नागपूर विद्यापीठाची बोगस पदवी तयार केली जाते का? या दृष्टीनेही इराकी दूतावास चौकशी करीत आहे. आखाती देशात दरवर्षि हजारो युवक नोकरीसाठी जातात. विदर्भातूनही अनेक तरुण नोकरीसाठी जातात. या कनेक्शनमुळेही नागपूर विद्यापीठाची निवड करून बोगस पदवी बनवण्यात आली असावी, असा संशय वर्तविला जात आहे. ही पदवी कुण्या एका व्यक्तीने तयार करून दिली असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून, यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.