धक्कादायक...नऊ महिन्यांतच दोनशेहून अधिक नागरिकांचा अपघातात बळी

By योगेश पांडे | Published: October 7, 2023 10:43 AM2023-10-07T10:43:28+5:302023-10-07T10:43:57+5:30

बेशिस्त वाहतुकीमुळे निष्पापांचा जातोय जीव : वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

Shocking... More than two hundred civilians died in accidents within nine months | धक्कादायक...नऊ महिन्यांतच दोनशेहून अधिक नागरिकांचा अपघातात बळी

धक्कादायक...नऊ महिन्यांतच दोनशेहून अधिक नागरिकांचा अपघातात बळी

googlenewsNext

योगेश पांडे

नागपूर : उपराजधानीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून बेदरकार वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. याचीच परिणिती प्राणघातक अपघातांची संख्या वाढण्यात होत असल्याचे वास्तव आहे. या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांतच नागपूर शहरात नागपुरात दोनशेहून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. दर महिन्याला सरासरी २३ जणांचा मृत्यू झाला असून मोठमोठे दावे करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना अद्यापही शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण आणता आले नसल्याचेच आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत नागपूर शहरात जवळपास ९०० अपघात झाले. त्यातील २०४ अपघात हे प्राणघातक ठरले व त्यात सुमारे २१५ लोकांचा जीव गेला. तर ८९० हून अधिक जण जखमी झाले. २०२२ मध्ये १ हजार ८० अपघात झाले होते व ३१० लोकांचा मृत्यू झाला होता. जखमींची संख्या १ हजार १६९ इतकी होती. पोलिस अधिकाऱ्यांकडून रस्ते अपघात नियंत्रणात आले असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अपघात व मरण पावलेल्या व्यक्तींची सरासरी जवळपास मागील वर्षीइतकीच कायम आहे.

गंभीर व प्राणघातक अपघातांचे प्रमाण अधिक

नागपूर पोलिसांच्या जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीतील आकडेवारीनुसार आठ महिन्यांत ७८४ अपघातांची नोंद झाली. त्यात १९० जणांचा बळी गेला व ७९८ जखमी झाले. यात ३५ महिलांचादेखील समावेश होता. या कालावधीत १८२ अपघात प्राणघातक ठरले तर ३१२ अपघात गंभीर स्वरूपाचे होते. २९० अपघात हे कमी गंभीर किंवा किरकोळ होते.

सदर उड्डाणपुलावर महिन्याभरात चार बळी

नागपुरातील अनेक रस्ते गुळगुळीत झाले असून त्यावर सुसाट वेगाने वाहने चालविली जातात. विशेषत: रात्रीच्या सुमारास तर वाहनांचा वेग अतिजास्त असतो. शिवाय शहरातील काही उड्डाणपुलांवरदेखील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदर उड्डाणपुलावर मागील महिन्यांतच एका शाळेतील दोघांचा अपघातात मृत्यू झाला. तर त्याच उड्डाणपुलावर दुचाकीवरील दोन तरुणांनादेखील अज्ञात कारच्या धडकेत जीव गमवावा लागला. सोबतच शहरातील अनेक मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे बसतात व त्यातूनदेखील अपघात होतात. मानेवाडा रोडवर समीर मधुकर धर्माधिकारी यांचा मोकाट जनावर समोर आल्याने अपघात झाल्याने मृत्यू झाला होता.

वर्षनिहाय अपघातांची आकडेवारी

वर्ष : एकूण अपघात : मृत्यू : जखमी

२०२० : ७७३ : २१३ : ७५१

२०२१ : ९५८ : २६८ : ९६४

२०२२ : १,०८० : ३१० : १,१६९

२०२३ (ऑगस्टपर्यंत) : ७८४ : १९० : ७९८

असे झाले आहेत अपघात (जानेवारी ते ऑगस्ट २०२३)

अपघाताचा प्रकार : संख्या : मृत्यू : जखमी

प्राणघातक अपघात : १८२ : १९० : ५१

गंभीर अपघात : ३१२ : ० : ४०५

किरकोळ अपघात : २९० : ० : ३४२

Web Title: Shocking... More than two hundred civilians died in accidents within nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.