धक्कादायक... एमआयडीसी, कळमन्यातून सर्वाधिक मुली-महिला गायब

By योगेश पांडे | Published: May 22, 2023 12:32 PM2023-05-22T12:32:42+5:302023-05-22T12:33:36+5:30

जरीपटका, पाचपावली, नंदनवनमधील आकडेवारीदेखील चिंताजनक : ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जास्त आकडा

Shocking... Most girls and women missing from MIDC, Kalamana area of Nagpur | धक्कादायक... एमआयडीसी, कळमन्यातून सर्वाधिक मुली-महिला गायब

धक्कादायक... एमआयडीसी, कळमन्यातून सर्वाधिक मुली-महिला गायब

googlenewsNext

योगेश पांडे

नागपूर : राज्यात बेपत्ता झालेल्या मुली-महिलांच्या आकडेवारीवरून राजकारण तापले असताना नागपुरातदेखील हा आकडा चिंताजनक आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार शहरातील ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चार महिन्यांत २० किंवा त्याहून अधिक मुली-महिला बेपत्ता झाल्या आहेत. एमआयडीसी व कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वात जास्त जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. यातील काही मुली स्वत:च्या मर्जीने घर सोडून गेल्या असल्या तरी ज्यांचा शोधच लागलेला नाही, अशा मुलींचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ९१२ लोक हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ४७१ महिला होत्या. चार महिन्यांत ३६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यातील बहुतांश मुली घरातून निघून गेल्या होत्या. ‘लोकमत’नेच सर्वप्रथम यावर प्रकाश टाकला होता. मुली-महिलांच्या घरातून निघून जाण्याची वेगवेगळी कारणे होती. ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या पोलिस ठाणेनिहाय आकडेवारीनुसार एमआयडीसी व कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चार महिन्यांत ३६ मुली व महिला बेपत्ता झाल्या. त्यातही जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च व एप्रिलमध्ये गायब होण्याचे प्रमाण जास्त दिसून आले. या दोन पोलिस ठाण्यांच्या पाठोपाठ जरीपटका व नंदनवन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून २९ मुली-महिला बेपत्ता झाल्याच्या नोंदी झाल्या. तर पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २८ मुली-महिला १२० दिवसांत बेपत्ता झाल्या.

२३ वर्षांपर्यंतच्या २०९ मुली बेपत्ता

सर्वसाधारणत: २३ वर्ष वयोगटातील मुली या विद्यार्थिनी असतात. कुठल्या ना कुठल्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनेक जणी असतात. या वयोगटातील २०९ मुली या कालावधीत बेपत्ता झाल्या आहेत. हा आकडा अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. यात अभ्यासाचा दबाव, घरातील वाद यांच्यासह प्रेमप्रकरणं हे एक मोठे कारण मानले जाते.

शोध न लागलेल्या मुलींचे काय?

सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ४७१ पैकी अर्ध्याहून अधिक मुली-महिलांचा शोध लागला तर अनेक जणी स्वत:हून घरी परतल्या. मात्र इतर जणींचा शोध लागलेला नाही. शोध न लागलेल्या या मुलींचे नेमके काय होते हा गंभीर प्रश्न आहे. पोलिसांच्या लेखी वर्षाच्या शेवटी शोध न लागलेल्या महिला असे लिहून आकडा लिहिण्यात येतो. मात्र याचे पुढे काय होते हा प्रश्न अनुत्तरीतच असतो. २०१६ पासून ते २०२२ या कालावधीत ८५७ महिला व मुलींचा शोधच लागला नव्हता. आता सव्वा सात वर्षांत शोध न लागलेल्या मुलींचा आकडा हजाराच्या वर पोहोचला आहे.

२० हून अधिक मुली-महिलांची नोंद

पोलिस ठाणे : आकडा

  • एमआयडीसी : ३६
  • कळमना : ३६
  • जरीपटका : २९
  • नंदनवन : २९
  • पाचपावली : २८
  • हुडकेश्वर : २५
  • अजनी : २४
  • वाठोडा : २२
  • सक्करदरा : २१
  • पारडी : २१
  • हिंगणा : २०

 

गायब झालेल्या मुली-महिला

महिना : बेपत्ता

  • जानेवारी : ८९
  • फेब्रुवारी : १११
  • मार्च : १३३
  • एप्रिल : १३८

Web Title: Shocking... Most girls and women missing from MIDC, Kalamana area of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.